BIG BREAKING | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबादमधील मोठी घटना
प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना या कृतीतून नेमका काय मेसेज द्यायचाय ते मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना त्यांनी औरंगाबादला जावून औरंगजेबाच्या समाधीला का भेट दिली? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, यावर प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद येथे औरंगजेबाची समाधी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये दाखल होत औरंगजेबाच्या समाधीला भेट दिलीय. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
‘औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का?’
“औरंगाबादच्या समाधींना भेट दिली आहे. इथे आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे. ती वास्तूदेखील बघायला आलेलो आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. “औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलंय की, जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या-राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घालाना, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते का? प्रकाश आंबेडकर म्हणतात…
औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजिबात नाही, असं उत्तर दिलं. “औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकापासून आहे. लोकांचा सेकंड कॅपिटलला विरोध असेल तर माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. सांगावं की, औरंगाबाद, खुलताबाद हा भाग भारताची दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावी”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर…’
औरंगजेबाचे व्हिडीओ स्टेटसला ठेवले म्हणून राज्यात वाद निर्माण झाला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता, “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय होऊ देता म्हणून होतो”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले आहेत.