Jalna Lathi Charge : राज ठाकरे यांचा उपोषणकर्ते जरांगे पाटील यांना फोन; काय बोलले राज?
मनसे नेते बाळा नांदगावकर हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आले आहेत. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांची विचारपूस केली. तसेच जखमींचीही चौकशी केली.
जालना | 3 सप्टेंबर 2023 : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने त्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. आज तिसऱ्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहे. ठिय्या आंदोलन केलं जात आहे. बंद पुकारला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, माजी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे आदी नेत्यांनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तर आज मनसे नेत्यांनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला.
मनसे नेते बाळा नांदगावकर हे सकाळीच जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात आले. या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या ठिकाणी शेकडो आंदोलक आंदोलनाला बसले आहेत. नांदगावकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. घटना कशी घडली? नेमका काय प्रकार झाला? याची माहिती घेतानाच किती लोकांना मारहाण झाली. त्यांची प्रकृती कशी आहे? आदी माहिती घेतली. तसेच या सर्वांना धीरही दिला.
तुम्ही काळजी करू नका…
त्यानंतर नांदगावकर यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन लावून जरांगे पाटील यांचं त्यांच्याशी बोलणं करून दिलं. राज ठाकरे यांनीही जरांगे पाटील यांच्याशी बराचवेळ संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी आंदोलकांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. तसेच काय प्रकार घडला? कसा घडला? याचीही माहिती घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी सर्व माहिती देतानाच आम्हाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारल्याचं सांगितलं.
आम्हाला खूपच मारलं. आम्ही अन्याय सहन करणार नाही. आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा, असं जरांगे पाटील म्हणाले. तर, तुम्ही काळजी करू नका. या आंदोलनात तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मनसे तुमच्या पाठी खंबीरपणे उभी आहे, असं आश्वासन राज ठाकरे यांनी आंदोलकांना दिलं.
घोडं आडलं कुठं?
यावेळी नांदगावकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. वैयक्तिक कामासाठी हे आंदोलन नाही. हे सामान्य कुटुंबातील गरीब असणाऱ्या माणसासाठीचं आंदोलन आहे. गरिबाला लाभ मिळावा यासाठी हक्काचं आंदोलन आहे. निजामशाहीत स्वातंत्र्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. आता का नाही? आरक्षण का देत नाही?
उत्तर महाराष्ट्रातही कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं. आता मराठवाड्यात का मिळत नाही? असा सवाल बाळानांदगावकर यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधकांचा मराठा आरक्षणाला आक्षेप नाहीये तर मग घोडं आडलं कुठं? आरक्षण का दिलं जात नाही? असा सवालही त्यांनी केला.