आता सुटका नाहीच… त्या दिवशी काय घडलं? खोक्या भोसलेची थेट घटनास्थळी परेड; बीड पोलीस लागले कामाला
शिरूर तालुक्यातील बावी गावात ढाकणे पितापुत्रांना मारहाण करणाऱ्या आणि हरणांची शिकार करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, घटनास्थळी त्याची कसून चौकशी सुरू आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड : हरणांची शिकार आणि ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत पळालेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. आज पोलीस त्याला थेट शिरूर कासार येथील बावी गावी घेऊन आले. ज्या ठिकाणी ढाकणे पितापुत्रांना मारहाण करण्यात आली, तिथेच त्याला आणलं गेलं. त्याच्याकडून पोलिसांनी घटनेची पूर्ण माहितीही घेतली.
खोक्या भोसले ऊर्फ सतीश भोसलेवर एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा ढाकणे पितापुत्रांच्या मारहाणीचा आहे. हा गुन्हा पोलिसांनी नोंदवून घेतला असून पोलीस तपास करत आहेत. दुसरा गुन्हा हा हरिणांची शिकार केल्याचा आहे. त्याचा तपास वन विभाग करत आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस खोक्याला शिरूर कासार तालुक्यातील बावी गावी घेऊन आले आहेत. खोक्याने ज्या ठिकाणी ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केली होती, तिथेच त्याला आणलं आहे. त्या दिवशी काय घडलं? याची माहिती घेण्यासाठीच पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन आले आहेत.
कसून तपास
माळरानावर ही मारहाणीची घटना घडली होती. त्याच ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले. ती जागा पोलिसांनी पाहिली. तसेच त्याला काही प्रश्नही विचारले. घटनाक्रम कसा होता याची माहितीही पोलिसांनी त्याच्याकडून घेतली. कोर्टाने खोक्या भोसलेला सहा दिवसाची कोठडी सुनावली आहे. त्याच्या कोठडीचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरवात केली आहे. तसेच त्याच्याविरोधातील पुरावे गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांना सहा दिवसात हा तपास संपवायचा आहे. त्यामुळे या प्रकरणातून आता खोक्याची सुटका होणे मुश्किल असल्याचंही दिसून येत आहे.
काय आहे प्रकरण?
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याने ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले होते. ढाकणे कुटुंबाने पोलीस संरक्षणाची मागणीही केली होती. तर दुसरीकडे सतीश भोसले यांच्या नातेवाईकावर कारवाई करावी, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, हे प्रकरण अंगलट आल्याने खोक्या भोसले फरार झाला होता.