मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं कार्यालय बुकीच्या जागेवर; सुषमा अंधारे यांचा सर्वात मोठा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये काल जाहीर सभा झाली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री स्वत:ला खुद्दार म्हणाले हा विनोदच आहे, असा टोला त्यांनी लगावला.
नांदेड : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणात बुकी अनिल जयसिंघांनी याच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल जयसिंघांनी हा फरार असून पोलीस त्याच्याही शोधात आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय अनिल जयसिंघानी याच्या जागेवरच असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे यांची मुखेड येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या… किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कसे? असा प्रश्न उपस्थित करतानाच ती जागा कोणाची? कोणाच्या नावावर? खरेदी विक्रीची कागदपत्रे तपासा, आव्हानही सुषमा अंधारे यांनी दिलं. जयसिंघानिया यांची जवळीक कोणाची? याचा तपास झालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
गॅस दरवाढ कमी करा
मी दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. मी घरी बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. तर देणारा मुख्यमंत्री आहे, असं एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील खेडमधील सभेतून म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचीही अंधारे यांनी खिल्ली उडवली. देणारे आहात तर महिलांना तिकीटात सवलत नको तर गॅसची किंमत चारशे रुपये करा, कापूस, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलं ते सांगा. संपकरी कर्मचारी, गारपिटग्रस्तांना काय दिले ते सांगा? असे सवाल त्यांनी केले.
शिंदे यांना लोकच उत्तर देतील
खेड येथील ही सभा उद्धव ठाकरे यांना उत्तर देणारी असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. त्याचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहीत आहे. गर्वाचे घर खाली असते. त्यांना लोकच उत्तर देतील, असंही त्यांनी सांगितलं.
सुंदर विनोद
मी गद्दार नाही खुद्दार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथील सभेत केले होतं. त्यावरूनही अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. गेल्या दहा वर्षातला हा अत्यंत सुंदर आणि दर्जेदार विनोद आहे, असा चिमटा त्यांनी काढला.