Aurangabad Gold: ऐन सणातही सोन्याची लोळण, खरेदीचा विचार असेल तर गुंतवणुकीची हीच संधी
महालक्ष्मीसाठी चांदीच्या भांड्यांची खरेदी बाजारात वाढलेली दिसून आली आहे. महालक्ष्मींसाठी चांदीच्या वाट्या, फुलपात्र, ताम्हण, ताट, तांबे, समया आदी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसत आहे.
औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तीव्र घसरण पहायला मिळाल्यानंतर काल बुधवारी औरंगाबाद शहरातील सोने-चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर घसरलेले दिसून आले होते. आज मात्र त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र आहे. मात्र सणासुदीच्या कालावधीतही सोन्याला फारशी मागणी नसल्याने सराफा बाजारात उत्साहाचे चित्र पहायला मिळत नाही.
शहरातले आजचे सोन्याचे भाव काय?
औरंगाबाद सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपये प्रति तोळा असे आहेत. कालच्या दरांपेक्षा सोन्याने काहीशी चढण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात फार वृद्धी न दिसता सोने केवळ 100 रुपयांनी महागले. काल बुधवारी 08 सप्टेंबर रोजी सोन्याचे दर 46,900 रुपये प्रति तोळा असे होते. गेल्या महिनाभरातील ही निचांकी पातळी होती. तसेच आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रचंड अस्थिरता दिसून आली होती.
चांदीचाही उभारीचा प्रयत्न
बुधवारी प्रचंड मोठी घसरण अनुभवलेल्या चांदीच्या दरांनी निचांकी पातळीवरून काहीशी उभारी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चांदीदेखील 500 रुपयांच्या पुढे झेप घेऊ शकली नाही. बुधवारी औरंगाबादच्या सराफा बाजारात चांदीचे भाव 66,500 रुपये प्रति किलो एवढा होता. हे दर वाढून गुरुवारी चांदीचे दर 67000 रुपये प्रति किलो असे झाले. सणासुदीत चांदीच्या वस्तू खरेदी वाढलेली असते त्यामुळे चांदीच्या दरांनी घेतलेली लोळण लवकर कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
महालक्ष्मीनिमित्त चांदीच्या भांड्यांची खरेदी जास्त
गणेशोत्सवादरम्यानच महालक्ष्मीचा सण असल्याने त्या निमित्त महालक्ष्मीसाठी चांदीच्या भांड्यांची खरेदी बाजारात वाढलेली दिसून आली आहे. महालक्ष्मींसाठी चांदीच्या वाट्या, फुलपात्र, ताम्हण, ताट, तांबे, समया आदी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसत आहे. तसेच काही ठिकाणी चांदीच्या गणेशमूर्तींनाही मागणी दिसून आली.
शनिवारीही सराफा मार्केट सुरु राहणार
गणपती आणि महालक्ष्मी सणांकरिता खरेदीसाठी नागरिकांची हळू हळू बाजारात गर्दी होत आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारीही औरंगाबादचा सराफा बाजार सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.
दरांतील ही घसरण कशाचे परिणाम?
सोन्या-चांदीचे दर सणासुदीत वाढत असतात, गणपती-गौरी किंवा दसरा-दिवाळीला सोन्याचे भाव वाढतात, असा सर्वसामान्य समज असतो. पण तज्ञांच्या मते, सण-उत्सवांचा या दरांशी काहीही संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात, शेअर बाजारातील चढ-उतारांनुसार, या बाजारातील हालचालींनुसार सोन्याचे भाव कमी-जास्त होत असतात. सध्याची स्थिती पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात अफगाणिस्तानमधील संकटामुळे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवरही याचा प्रभाव दिसून येत आहे. सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचाही यावर परिणाम होत असतो. एकूणच कमोडिटी मार्केटमधील चढ-उताराचा परिणाम विविध शहरांतील सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येतो.
इतर बातम्या-