हिटर लावताना जपून, लातूरमध्ये जे घडलं ते कुठेही होऊ शकतं, उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन सख्ख्या बहिणी…
लातूरच्या कव्हा गावचे महादेव शेळके, कल्पना शेळके यांच्या त्या शाळकरी मुली आहेत. सकाळी लवकर कामाला जावे लागते म्हणून एका बादलीत पाणी तापवण्यासाठी ठेवले होते.
लातूर | 30 जुलै 2023 : लातूरमध्ये अत्यंत दुर्देवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे किती मोठी भयंकर घटना घडू शकते याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हिटरचं उकळतं पाणी दोन मुलींच्या अंगावर पडलं. त्यामुळे या दोन्ही सख्ख्या बहिणी प्रचंड भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका दुर्लक्षामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे हिटर लावताना जपून राहा. काळजी घ्या.
घरात लावलेल्या हिटरचे उकळते पाणी अंगावर पडल्याने लातूर जिल्ह्यातल्या कव्हा इथे दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. पाणी गरम करण्यासाठी वडिलांनी हिटर लावले होते. हिटर लावल्या नंतर वडील बाहेर निघून गेले. त्यामुळे हिटरकडे कोणीही लक्ष दिले नाही. माहेश्वरी (वय-11) आणि योगेश्वरी (वय-13) या दोन चिमुकल्या बाजूलाच जमिनीवर झोपल्या होत्या. हिटर गरम होऊन फुटल्याने उकळते पाणी या दोघींच्या अंगावर कोसळले. यामध्ये दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या.
पाय लागला अन्…
लातूरच्या कव्हा गावचे महादेव शेळके, कल्पना शेळके यांच्या त्या शाळकरी मुली आहेत. सकाळी लवकर कामाला जावे लागते म्हणून एका बादलीत पाणी तापवण्यासाठी ठेवले होते. योगेश्वरी इयत्ता 7वीत शिकते आणि माहेश्वरी इयत्ता 6वीत शिकते. या दोघी रात्री अभ्यास करून तिथेच झोपल्या होत्या. सकाळी बादलीत तापलेले उकळत पाणी या दोघींच्या शेजारीच होते.
सकाळी साखर झोपेत असताना योगेश्वरीचा पाय बादलीला लागला. बादली खालचा पाटा निसटल्यानं उकळते पाणी या दोघींच्या अंगावर पडले अन् दोघीही पूर्णतः भाजल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितलेय. या दुर्घटनेत योगेश्वरी 90% आणि माहेश्वरी ७०% भाजली आहे. लातूरमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.
आर्थिक मदतीचं आवाहन
शेळके कुटुंबीयांची आर्थिस परिस्थिती हालाखीची आहे. शेती आणि मोलमजुरीवर त्यांचं घर चालतं. कुटुंब मोठं आहे. बेताचीच कमाई असल्याने खासगी रुग्णालयात मुलींवर उपचार करताना पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळे या मुलींवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन सोशल मीडियातून अनेकजण करत आहेत.
दानशूरांनी पुढे येऊन स्वत: शेळके कुटुंबीयांना भेटून आर्थिक मदत करावी किंवा थेट रुग्णालयाशी संपर्क साधून या मुलींच्या उपचाराचा खर्च उचलावा, असं आवाहन करण्यात येत आहे.