Aurangabad: शहरात 70 हजार नागरिकांनी चुकवला दुसरा डोस, 44% लोकांचेच लसीकरण पूर्ण! आजपासून 500 रु. दंड!
औरंगाबादेत पहिला डोस घेतलेल्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येकाला मेसेज पाठवले, मात्र हा कालावधी लोटल्यानंतरही शहरातील तब्बल 70 हजार नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.
औरंगाबादः शहरातील पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी (Corona vaccination) पात्र असलेल्या नागरिकांचा आकडा तब्बल 70 हजारांच्या घरात आहे. वारंवार आदेश जारी करून, जनजागृती करूनही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. पात्र असूनही या नागरिकांनी दुसरा डोस चुकवल्याचे समोर आल्यानंतर शंभर टक्के लसीकरणाचे मोठे आव्हान महापालिकेसमोर उभे आहे.
लसीकरणाची लवकरच वर्षपूर्ती, 44% लोकांनेच दोनन डोस
शहरात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून येत्या काही दिवसात वर्ष पूर्ण होईल. या काळात आतापर्यंत शहरात 10 लाख 55 हजार 600 नागरिकांना दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. पहिला डोस घेतलेल्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येकाला मेसेज पाठवले, मात्र हा कालावधी लोटल्यानंतरही शहरातील तब्बल 70 हजार नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांचा पत्ता, फोन नंबर महापालिकेकडे आहे. आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर किंवा दूरध्वनीमार्फत त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच नजीकच्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी सांगण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात आतापर्यंत 2 लाख 31 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
आव्हान कायम, उद्दिष्ट मोठे
शहरात 10 लाख 55 हजार 600 (80%) नागरिकांनी आतापर्यंत लसीकरण पूर्ण करणे अपेक्षित होते. या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत 8 लाख 46 हजार 362 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 4 लाख 72 हजार 960 (44%) नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तरीही डिसेंबर अखेरपर्यंत पहिला डोस घेतलेल्यांचे टार्गेट पूर्ण करू असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
आजपासून दंडात्मक कारवाई
दरम्यान पात्र असूनही कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांवर आजपासून महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. अशा व्यक्तींना 500 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे. या मोहिमेमुळे जास्तीत जास्त नागरिक लसीकरण करून घेतील अशी अपेक्षा महापालिकेला आहे.
इतर बातम्या-