शरद पवार यांच्यासभेत शक्तीप्रदर्शन करत प्रवेश, धनंजय मुंडे यांना टेन्शन; कोण आहेत बबन गित्ते?
जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीला बळ मिळालं आहे. तसेच धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणूनही बबन गित्ते यांच्याकडे पाहिले जात आहे.
बीड | 18 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल बीडमध्ये प्रचंड मोठी सभा घेतली. या सभेला लाखभर लोक उपस्थित होते. अगदी कमी वेळात शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेला सर्वच वयोगटातील लोक मोठ्या संख्यने उपस्थित होते. पवार यांच्या या सभेमुळे अजितदादा गटात खळबळ उडाली आहे. स्वत: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही या सभेने टेन्शन आलं आहे. केवळ सभेनेच नव्हे तर आणखी एका कारणाने धनंजय मुंडे यांना टेन्शन आलं आहे. ते म्हणजे बबन गित्ते. बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलून जाणार आहेत.
बबन गित्ते यांनी काल परळीत मोठं शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जवळपास एक हजार वाहनांच्या ताफ्यासह बबन गित्ते हे सभा स्थळी आले होते. त्यावरून गित्ते यांच्यामागे परळीतील मोठी जनशक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून गित्ते यांना बळ दिलं आहे. त्यामुळे गित्ते यांचं बीडच्या राजकारणातील वजन अधिकच वाढलं आहे. आता मुंडे बहीण-भावाच्या लढतीमध्ये गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात आता बबन गित्तेंच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झालाय. त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.
गित्ते यांच्या लढतीचा थेट फायदा कुणाला?
गित्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास परळीत तिरंगी लढत होईल. त्याचा थेट फटका दुसरा तिसरा कुणाला नसून धनंजय मुंडे यांना बसणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अजितदादा गटाची भाजप सोबत युती आहे. मुंडे हे परळीचे विद्यमान आमदार आहेत. मंत्री आहेत. त्यामुळे परळीच्या जागेवर अजितदादा गट हक्क सांगेल.
तर, दुसरीकडे पंकजा मुंडेही या जागेसाठी आग्रही असणार आहे. त्यामुळे परळीच्या जागेचा तिढा सोडवणं भाजपसाठी कठिण होणार आहे. गित्ते यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने परळीतील विजयाच्या आशा वाढल्यामुळे पंकजा मुंडे परळी सोडण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे परळीत नेमकं काय घडेल? हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
कोण आहेत बबन गित्ते?
बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गित्ते यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठे संघटन उभे केलेले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलेला आहे. सर्व सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते रात्री-बेरात्री तत्पर असतात. गोरगरीबांना त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असून अनेकांचे संसार त्यांनी बसविलेले आहेत.
गित्ते यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या आहेत. त्या परळी पंचायत समितीच्या सभापतीही होत्या. पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या विविध योजना परळी तालुक्यातील शेतकरी आणि गोरगरीबांच्या दारी पोहचवून जनतेची सेवा केलेली आहे. एकंदरीत बबन गित्ते यांना मानणारा वर्ग परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे.
भाकित खरे ठरणार
दरम्यान, कालच्या सभेत गित्ते यांनी मोठं भाकित केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांना मी पाठिंबा दिला. त्यानंतर मुंडे मंत्री झाले. पंकजा मुंडे यांना मी पाठिंबा दिला. त्याही मंत्री झाल्या. नंतर धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला, तेही मंत्री झाले. आता मी शरद पवार यांच्यासोबत आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादीचं सरकार येणार आहे, असं भाकित गित्ते यांनी केलं आहे. त्यामुळे गित्ते यांचं भाकित खरं ठरतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.