भांडण सोडवण्यास गेलेल्या दामिनी पथकावरच हल्ला, हातातील काठी घेत पोलिसालाच मारहाण, औरंगाबादची घटना
या तरुणींविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रात्रीची वेळ असल्याने त्यांना नोटीस देऊन घरी पाठवले. तर गुरुवारी शुभांगीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला सध्या जामिनीवर सोडले आहे.
औरंगाबादः शहरात कुठेही महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या दामिनी पथकाला (Damini Squad) वेगळाच अनुभव आला. नेहरू उद्यान परिसरातील भांडण सोडवण्यास गेलेल्या या पथकावरच भांडणाऱ्या महिलांनी हल्ला केला. त्यामुळे बुधवारी या ठिकाणी मोठा गोंधळ उद्भवला. अखेर काही वेळानंतर पोलिसांना आणखी फौजफाटा मागवावा लागला आणि या दोन आक्रमक तरुणींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात (Begampura police station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेहरू उद्यान परिसरात वादातून भांडण
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नेहरू उद्याव आहे. हे उद्यान महापालिकेचे असून तेथे एक सुरक्षा रक्षक दाम्पत्य राहते. उद्यानातील संपूर्ण सुरक्षेचे काम ते पाहतात. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शुभांगी आणि एक अल्पवयीन तरुणी उद्यानातील माती घेऊन जाण्यासाठी आल्या. त्यांना सुरक्षारक्षक दाम्पत्याने विरोध केला. त्यावरून तरुणींनी दाम्पत्याशी वाद घातला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला. या दोघींनीही सुरक्षा रक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलीला मारहाण केली. त्यामुळे काही काळ खूप गोंधळ उडाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला दिली.
दामिनी पथकावरच आक्रमक तरुणींचा हल्ला
नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच दामिनी पथकातील उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, अंमलदार आशा गायकवाड, लता जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिशय आक्रमक असलेल्या तरुणींनी दामिनी पथकाविरुद्ध भूमिका घेत उपनिरीक्षक उमाप यांना केस धरून जमिनीवर आपटले. हा प्रकार पाहून आशा गायकवाड व लता जाधव पुढे सरसावल्या. तेवढ्यात शुभांगी कारके हिने गायकवाड यांच्या हातातील लाठी हिसकावून त्यांच्याच डोक्यात मारली. तर अल्पवयीन तरुणीने लता जाधव यांचा हात पिरगाळला. त्यांनी दामिनी पथकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली. या प्रकारानंतर पोलिसांना फौजफाटा मागवत दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रात्रीची वेळ असल्याने त्यांना नोटीस देऊन घरी पाठवले. तर गुरुवारी शुभांगीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला सध्या जामिनीवर सोडले आहे.
इतर बातम्या-
अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई