औरंगजेबाची कबर फोकसला त्यांनीच आणली, त्यांनाच कबर हटवायची नाही; मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा आरोप
मराठा समाजाची आज अंतरवलीतील छत्रपती भवनला ही बैठक आहे. भरपूर लोक येत आहे. राज्याीतल 20 तालुक्यातून लोक येत आहे. सर्व गावाच्यावतीने आम्ही निमंत्रण दिलं आहे. समाजाच्या अनेक अडचणी आहेत. रुग्णालय, जमिनी आणि इतर अनेक अडचणी आहेत. त्या कळतच नाही. सर्व काही झाल्यावर कळतं. तसं होऊ नये, लोकांना मदत मिळावी यासाठी ही बैठक आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ही कबर हटवण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. नागपूरमध्ये तर या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गट आपआपसात भिडले. त्यामुळे नागपूरची परिस्थिती चिघळली. या घटना ताज्या असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकारलाच औरंगजेबाची कबर हटवायची नाहीये. सरकारला कबर हटवायची असती तर त्यांनी तिथे पोलिसांचं संरक्षण दिलंच नसतं, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हा दावा केला आहे.
सरकारलाच औरंगजेबाची कबर काढायचीच नाही. त्यांनीच कबर फोकसला आणली. ते डबडं कुठं पुरून ठेवलंय हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी उलट माहिती करून दिली. औरंगजेबला फोकसमध्ये आणलं.सरकारला कबर काढायचीच नाही. काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण नसतं लावलं. त्यांना फायद्यासाठी लढायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला खाक केलं
त्यांना मराठ्यांची नस कळली आहे. मारामाऱ्या करण्यासाठी त्यांनी मराठ्यांना ठेवलं आहे. यांनी आमचा खूप वापर केला. आमच्या लेकरांनी मारामाऱ्या करायच्या आणि मलिदा यांनी खायचा सुरू आहे. त्यामुळे मराठ्यांचं वाटोळं झालं. 70-75 वर्ष यांनी मराठ्यांचा भांडणासाठी वापर केला. ते फक्त उकरून काढतात आणि भांडणं लावून मोकळे होतात. या राजकारणामुळे आमच्या समाजाची लेकरं खाक झाली. आम्हाला शिक्षण दिलं नाही, नोकरी दिली नाही. आम्हाला खाक केलं, असा हल्ला जरांगे यांनी चढवला.
सरकारने दिवा बत्तीसाठी पैसे भरले
सरकारला कबर काढायचीच नाही. सरकारनेच या कबरीच्या दिवा बत्ती, हार-फुलांसाठी पैसे दिले आहेत. 2 लाख 60 हजार रुपये बिल सरकारनेच भरले, असा दावाही त्यांनी केला.
मराठा सेवक म्हणून काम करेल
आज अंतरवली सराटीत मराठा समाजाची बैठक आहे. त्याची माहितीही त्यांनी दिली. बैठकीला महाराष्ट्रातील मराठा सेवक बोलावले नाही. हा बैठकीचा पहिला टप्पा आहे. गोरगरीबांचे कामे करण्यासाठी, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कोणी तरी गावात एक मुलगा पाहिजे, तो नियुक्त करायचा आहे. आपण सेवक म्हणून काम करणार आहोत. नोकर म्हणून काम करणार आहोत. समाजाची सेवा करण्यात मोठेपण आहे. याची जबाबदारी एकावर असली पाहिजे. पूर्ण गाव आमचं एक आहे. पण काम करायला कोणी नाही. त्यामुळे आलेल्या अडीअडचणी सांगायच्या कुणाला? त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची गोष्ट राज्यातील सर्व गावांना कळली पाहिजे आणि तिकडची गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. फक्त अडीअडचणी सोडवण्यासाठी एक माणूस द्यायचा. तो मालक नसेल, अध्यक्ष नसेल, शाखाप्रमुख नसेल, प्रमुख नसेल, काहीच नसेल. त्याच्याकडे कोणतं पद नसेल. पण तो सेवक म्हणून जनतेच्या कामासाठी धावून जाईल. मराठा सेवक म्हणून करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
निर्णायक बैठक नाही
मराठा सेवक नियुक्त केला तरी तो सर्व जातीधर्माच्या समस्या सोडवणार आहे. म्हणून पहिल्या टप्प्यात वीस एक तालुक्त्यातील लोकांना बोलावलं आहे. महाराष्ट्रासाठीची बैठक असती तर रानात मंडप घातला असता. बैठकीला बसल्यावर आरक्षणाचा विषय निघेल. पक्ष नाही, संघटना नाही. आम्ही सात कोटी एकत्र आलोय. कशाला पाहिजे संघटना आणि पक्ष. गरज नाही. समाजच बलाढ्य आहे. फक्त समाजाच्या हाताखाली अडीअडचणी जाणून घेण्यासाठी एखादं पोरगं पाहिजे. म्हणून आम्ही बैठक घेतली आहे. ही निर्णायक बैठक नाही. जुनी पोस्ट पोरांनी व्हायरल केली आहे. एका गावातून एक एका मुलाला बोलावलं. एकूण आठ टप्प्यात बैठका होणार आहे. राज्यातील लोकांना एक एका टप्प्यात बोलावलं जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.