बाळापूर मतदारसंघातल्या दोन गावांत ‘बॅलेट’वर ‘मॉक पोल’, निकाल काय लागला?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील तुळजापूर आणि बेलताडा गावांमध्ये नियोजित 'मॉक पोल' अपयशी ठरला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरेंनी घोषित केलेल्या या मतदानाची स्थानिकांना माहिती नसल्याने आणि कोणतीही तयारी नसल्याने हे मतदान होऊ शकले नाही.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या दोन गावांत आज ‘बॅलेट’वर ‘मॉक पोल’ची घोषणा करण्यात आली होती. तर बाळापूर मतदारसंघातल्या पातूर तालूक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार होतं. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रकाश पोहरेंनी या दोन्ही गावांत ‘मॉक पोल’ची घोषणा केली होती. मात्र, घोषणा करूनही या गावात गावकऱ्यांनाही कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे बॅलेट मतदानाची कोणतीच तयारी नव्हती. त्यामूळे हा प्रसिद्धी स्टंट असल्याचं बोललं जात आहे.
सोलापुरातील मरकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील ‘मॉक पोल’ मोठ्या वादाचा विषय ठरलं होतं. तर अकोला जिल्ह्यातील दोन गावांसंदर्भात अशाच पद्धतीने ईव्हीएमला आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरेंकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर गावात पोलिसांनी महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या दिला होता. आज या दोन्ही गावात मतदानाची कोणतीच तयारी नसल्याने मतदान झालं नाही.
नेमकं काय घडलं?
या दोन्ही गावात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांना आघाडी मिळाली आहे. आज तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार होतं. यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पेट्या ठेवल्या जाणार होत्या. यात उमेदवारांच्या नावाचे बॅलेट वापरले जाणार नव्हते तर मतदारांनी आपला आधार नंबर किंवा मतदान यादी क्रमांक लिहून बॅलेटवर आपलं मतदान असलेल्या तीन पैकी एका बॉक्समध्ये टाकायचं होतंय. मात्र आयोजकांनी यातल्या कोणत्या गोष्टीची गावकऱ्यांसोबत चर्चा न केल्याने हे सारं बारगळलं आहे.
मरकडवाडीत मॉक पोलवरून मोठा वाद झाल्याने अकोल्यात जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीपासूनच गावात मुक्काम ठोकून होते. शेवटी मतदानच न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.