धनंजय देशमुख यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची टीका; म्हणाले, ‘कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न उभा करणाऱ्यांवर…’
संतोष देशमुख या बीडच्या मस्साजोग गावाच्या सरपंचांच्या हत्येचा तपास वेगाने करण्याची मागणी करत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर आक्षेप घेतला आणि त्याला राजकीय षडयंत्र तर नाही ना? असा संशय व्यक्त केला. त्यांनी देशमुख कुटुंबियांना पोलिसांना मदत करण्याचे आणि न्यायालयात स्टेटमेंट देण्याचे आवाहन केले. या प्रकरणात मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही सदावर्ते यांनी टीका केली.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती मिळावी, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोग गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यांनी जवळपास चार तास हे आंदोलन केलं. बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी येत त्यांना खाली उतरण्याचं आवाहन केलं. अखेर योग्य आश्वासन मिळाल्यानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीखाली उतरले. धनंजय देशमुख यांच्या या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. “शोले सारखा स्टंटही वास्तविक रियल लाईफमध्ये चालत असतो. आमच्या एसटीमधील एका कष्टकरी टॉवरवर चढला होता तर त्याची नोकरी गेली. त्याला शिक्षा दिली. तर टॉवरवर चढून कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न उभा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार केला पाहिजे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“भावनांचा आदर असावा. पण भावनांचा राजकीय खेल नसावा. एक लक्षात घ्या, या आंदोलनाची रूपरेषा बदलत चालली आहे. धाराशिवमध्ये आंदोलनात बिग बॉसमध्ये जसी म्यूसिक सिस्टीम तसी या आंदोलनात होत चालली आहे. दुसरा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, आम्ही पाण्याच्या टाकीवर चढू. पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर तुम्ही म्हणता अशा प्रकारची, तसल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे. कोणत्या संहितेमध्ये लिहिलं आहे की, एका व्यक्तीने म्हटल्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. असं कायद्यात कुठेही नाही”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
‘हे कोणाचं तर षडयंत्र आहे?’
“कायद्यात तक्रारदारला तक्रार देण्याचा अधिकार आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हे मान्य आहे. मात्र अमुकप्रकारे पोलिसांनी काम करावं. पोलिसांनी तसाच वागलं पाहिजे. हे बोलण्याची मुभा कोणालाच नाही. टाकीवर उभं राहुन आंदोलन करा आणि असं नाही झालं तर मी माझा जीव देतो. अनेक केसेस झाल्या, त्यात फाशी झालेली कोणी पाहिली का? उद्या संविधान प्रेमी जर टाकीवर चढले तर फाशी दिली जाणार आहे का? ही कोणी तरी लाईन देतो. ही पोलिटिकल लाईन आहे. हे कोणाचं तर षडयंत्र आहे?”, असा सवाल सदावर्ते यांनी केला.
सदावर्ते यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका
यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. “यात जरंग्या कसा काय आला? त्याला माहिती होतं का? जरंग्या महाभारतमधला संजय आहे का? जरांगे येऊन तिथे मध्यस्थी करतो. आमचं म्हणणं आहे की, तुमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा अधिकार धनंजय देशमुख किंवा कोणालाही नाही”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते यांची संतोष देशमुखांच्या पत्नीच्या आरोपांवर प्रतिक्रिया
गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीकडून करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “तपास जेव्हा सुरू असतो तेव्हा सामाजिक कार्यकर्ता किंवा इतर कोणीही काहीही बोलू नये. ज्यांना काही माहिती द्यायची असते त्यांनी पोलिसांना द्यावी. पोलिसांशी बोला. माध्यमात बोलू नये. पोलिसांना स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचा अधिकार आहे. फार भीती वाटली तर न्यायालयासमोर जाऊन स्टेटमेंट द्यावे. मला असं वाटतंय की देशमुख कुटुंबीयांनी न्यायालयासमक्ष बोलावं. स्टेटमेंट रेकॉर्ड करावं. जीवाला धोखा असेल तर न्यायाधीश स्टेटमेंट रिकोर्ड करून घेतात. इतर ठिकानी बोलण्यापेक्षा, तपासाच्या दृष्टीकोणातून आणि न्याय मिळण्याच्या दृष्टीकोनातून तपास यंत्रणेला मदत केलं पाहिजे”, असं आवाहन गुणरत्न सदावर्ते यांनी केलं.