बीड जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात 71 कोटींची वाढ; आता मिळणार 360 कोटी रुपये
बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा वार्षिक नियोजनाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा (Beed District) वार्षिक नियोजनाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी सर्वसाधारणच्या 288.68 कोटींच्या आराखड्यात वाढ करून दिली जावी अशी, आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली असता, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारणच्या आराखड्यासाठी 288.68 कोटींवरून वाढवत 360 कोटी देण्यास मान्यता दिली.
अखर्चित निधी खर्च करण्याचे आदेश
दरम्यान मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीस देण्यात आलेल्या 340 कोटी रुपयांपैकी अखर्चित असलेल्या निधी 100% खर्च करण्याचे नियोजन 15 फेब्रुवारीच्या आत करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी अजित पवारांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, पूल यांसह अन्य सार्वजनिक मालमत्ता दुरुस्तीसाठी बीड जिल्ह्यास अतिरिक्त निधी देण्यात यावा, मातोश्री पांदण रस्त्यांच्या योजनेस मान्यता, जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड, श्री क्षेत्र गहिणींनाथगड तसेच पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड व परळी वैद्यनाथ देवस्थान व जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या तीर्थ स्थळांच्या विकास आराखड्यास अर्थ व नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले असता, या सर्व विषयांसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची शक्य असलेली सर्व कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केली जावीत, तसेच या व्यतिरिक्त निधीची मागणी नियोजन विभागास सादर करावी असेही यावेळी पवारांनी सांगितले. कोविड काळात बीड जिल्ह्यात उपाययोजना व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान माजलगाव व आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास तसेच जिल्ह्यातील अन्य आवश्यक असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची दुरुस्ती व नाविनिकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र तरतूद करून देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
पुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात…