Pankaja Munde | “तुम्ही माझी माणसं आहात का? की माझे शत्रू आहात?”, पंकजा मुंडे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापल्या
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज दसरा मेळावा निमित्ताने बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत भाषण करताना पंकजा मुंडे आपल्याच कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापलेल्या बघायला मिळाल्या. "तुम्ही माझी माणसं आहात का? की माझे शत्रू आहात?", असे प्रश्न पंकजा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून विचारले.
बीड | 24 ऑक्टोबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज सावरगावमध्ये भगवान बाबा गडावर दसरा मेळाव्याची जाहीर सभा झाली. त्यांच्या सभेसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पंकजा मुंडे यांनी जवळपास एक तास आपलं भाषण केलं. त्यांचं भाषण सुरु असताना आज त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचं भाषण सुरु असताना तांत्रिक अडचणींमुळे माईक बंद पडला. त्यानंतर पंकजा यांनी दुसरा माईक हातात घेतला. विशेष म्हणजे आजच्या सभेत कार्यकर्त्यांकडून सुरु असलेली घोषणाबाजी ही पंकजा मुंडे यांच्यासाठी चांगलीच डोकेदुखी ठरली. त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. काही कार्यकर्ते उभे राहिले होते. पंकजा यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांना विनम्रपणे खाली बसण्याची विनंती केली. तसेच कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं. पण तरीही कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पंकजा यांना आपल्याच कार्यकर्त्यांचा राग आला.
‘तुम्ही माझी माणसं असूच शकत नाहीत’
“माझं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वागत केलं. सर्व समाजाच्या बांधवांनी माझं स्वागत केलं. ऊसतोड मजुरांच्या प्रतिनिधींनी माझं स्वागत केलं. मी सर्वांचे आभार मानते”, असं म्हणत पंकजा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. “तुम्ही का आलात? मला सांगा बरं. मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मला कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात का? माझ्यासाठी आलात का, भगवान बाबासाठी आलात का? मी असं तुम्हाला काय दिलंय?”, असे प्रश्न पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं.
पंकजा यांनी भाषण सुरु झाल्यानंतर आता पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला होता. पण तरीही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी आणि गोंधळाचा आवाज सुरु होता. त्यामुळे पंकजा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून संताप व्यक्त केला. “तुम्ही माझी माणसं आहात का? की माझे शत्रू आहात? नाही तुम्ही माझी माणसं असूच शकत नाहीत. राजकारण मी करावं का? की सोडून द्यावं? मग तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे असाल तर खाली बसा आणि हाताची घडी करा आणि बस करा. जो घोषणा देईल त्याला खाली बसवा. नंतर त्याला बाकी बघून घ्या”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
पंकजा यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार
“माझी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा होणार होती तेव्हा मला वाटलं नव्हतं की लोक मला एवढं प्रेम देतील. पण त्या भव्यतेला दिव्यतेला देण्याचं काम जनतेने केलं. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत 11 कोटी रुपये तुम्ही जमा केले. अहो तुम्हाला बसायला द्यायला माझ्याकडे साधी सतरंजी सुद्धा अंथरता येत नाही. तुम्हाला काही खाऊ घालता येत नाही. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरच्यांना उन्हात ठेवलंय आणि मी सुद्धा उन्हात आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत बसण्याचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“एकवेळ मला देऊ नका. पण माझ्या माणसाला त्यांच्या हक्कापासून दूर ठेवू शकत नाही. ज्याला पदं दिली असतील ते माझ्यापासून दूर जाऊ शकतात. पण ही जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. हारने का मतलफ, गिरने का मतलफ नजरों से गिरना है, खुर्ची से गिरना नहीं”, असं पंकजा म्हणाल्या.