ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर ओतली, हातात होती दोन लाखांची बॅग… परळीत धक्कादायक प्रकार
शहरातील वैद्यनाथ बँकेच्या परिसरात घडलेला प्रकार ऐकून तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकत चोरट्यांनी त्यांच्या हातातली दोन लाख रुपयांची बॅग पळवून नेलीय.
संभाजी मुंडे, परळीः तालुक्यात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून परळीत चोरट्यांनी धुकामूळ घातलाच आहे. आता शहरातील वैद्यनाथ बँकेच्या परिसरात घडलेला प्रकार ऐकून तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकत चोरट्यांनी त्यांच्या हातातली दोन लाख रुपयांची बॅग पळवून नेलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा घडला प्रकार?
या धक्कादायक प्रकारात सोमेश्वर सृष्टी येथील रहिवासी प्रभाकर शिंदे यांनी फिर्याद नोंदवली आहे. प्रभाकर शिंदे हे सेवानिवृत्त असून त्यांचे वय 66 वर्षे आहे. शहरातील वैद्यनाथ बँकेच्या परिसरात त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. झालं असं की प्रभाकर शिंदे बँकेतून एका पिशवीत दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन निघाले. मात्र त्यांच्या हातातील ही बॅग पळवण्याचा डाव तीन चोरांनी आखला होता. प्रभाकर यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकून त्यांनी बरोबर चोरी केली. अंगावर खाजेची पावडर पडल्याने सुरुवातीला प्रभाकर यांना काही समजलेच नाही. मात्र काही वेळानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा हा प्रकार स्पष्ट दिसतोय.
फुटेजमध्ये काय दिसते?
बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रभाकर शिंदे हे बँकेच्या पायऱ्यांवरून खाली येताना दिसतात. त्यांच्या हातात बॅग होती. मात्र मागून येणाऱ्या एका चोराने त्यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकलेली होती. त्यामुळे प्रभाकर शिंदे हे पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर डावीकडे असलेल्या पोर्चमध्ये थांबले. बाकावर पिशवी ठेवली आणि अंग खाजवण्यासाठी त्यांनी शर्ट काढला. तेथे खाली त्यांचे पैसे पडले. तोपर्यंत खाजेची पावडर टाकणार चोर गेटपर्यंत पोहोचला होता. चोराच्या दुसऱ्या एक साथीदार पोर्चजवळच होता. शिंदे हे शर्टमधून पडलेले पैसे उचलण्यासाठी खाली वाकले, तेवढ्यात त्याने बाकावर ठेवलेली बॅग पळवली. एवढ्या शिताफीने केलेली ही चोरी पाहून सगळेच थक्क झालेत. दिवसा ढवळ्या, बँकेतील सुरक्षा रक्षकांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या-