बीडमध्ये हालचाली वाढल्या, धनंजय देशमुख CID कार्यालयात, तपासात मोठी गती
संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे. शंभरहून अधिक जणांची चौकशी झाली असून, संशयित वाल्मिक कराडच्या पत्नीचीही चौकशी झाली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात गेले आहेत. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासाला गती आलेली बघायला मिळत आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास केला जातोय. सीआयडीकडून अतिशय वेगाने तपास सुरु आहे. सीआयडी पथकाने दोन दिवसांत फरार संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत संपर्कात असणाऱ्या तब्बल 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीचीदेखील दोन दिवसांपूर्वी चौकशी झाली होती. यानंतर बीडच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची चौकशी झाली होती. यानंतर अनेकांची चौकशी झाली. त्यानंतर आता या प्रकणात आणखी महत्त्वाच्या हालचाली घडताना दिसत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सीआयडी कार्लायात दाखल झाले आहेत.
धनंजय देशमुख आज अचानक सीआयडी कार्यालयात का आले? त्यांना सीआयडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं का? किंवा ते स्वत:हून आले आहेत का? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक नवनीत कांवल हे देखील बीड पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आता तपासात मोठी गती येताना दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीक़ून सध्या एका महिलेची चौकशी सुरु आहे.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, बीडच्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेले भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी आज मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीड आक्रोश मोर्चाची जनभावना त्यांच्या कानावर घातली. “परवा मी बीड येथील आक्रोश मोर्चात सहभागी होऊन मोर्चातील सहभागींची जनभावना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहचवण्याचा शब्द दिला होता. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली”, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.
“बीड येथील निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीच्या हाकेवरुन निघालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या जनसामान्यांची जनभावना त्यांच्या कानावर घातली. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री महोदय स्वतः अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी गुन्हेगारांची बँक खाती गोठवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे, उर्वरित फरार आरोपींची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून त्यांनाही लवकरच अटक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे”, अशी प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. “वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी होता. मात्र अद्याप जाणीवपूर्वक कारवाई होत नाही. लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची वाट पाहत आहेत. ३०२ मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नाही. मोक्का लावू असं सभागृहात सांगितलं होतं. मात्र अद्याप काहीच हालचाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतली नाही. उलट सभागृहात अजित पवार सुरेश धस यांना डोळ्यांबाबत खुणावत आहेत. तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते. मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? मी आका काका म्हणणारा नाही मी थेट मुंडे नाव घेतलं आहे”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.