आरोपींना जन्मठेप | महाराष्ट्राला हादरवणारा सोनी हत्याकांडात तिहेरी हत्या कशासाठी झाली होती
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना जन्मठेप झाली. आरोपींनी ही हत्या का घडवली होती. मग पोलिसांच्या सापळ्यात ते कसे आले, पाहू या...
तेजस मोहतुरे, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. त्यात सर्व सात आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. परंतु हे हत्याकांड कशासाठी झाले होते.
तुमसर शहरातील रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या संजय चिमणलाल सोनी (47), पुनम संजय सोनी (43), ध्रुमिल संजय सोनी (11) ह्या एकाच कुटुंबातील तिघा लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या कोणी बाहेरच्या व्यक्तीने केली नव्हती तर त्यांचा चालकाने कट रुचून हत्या केली होती.
का केली होती हत्या
सराफाचा व्यवसाय संजय सोनी करत होते. व्यवसायानिमित्त ते सोन्या-चांदीची दगिन्यांची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. नेहमीप्रमाणे 25 फेब्रुवारी2014 ला संजय सोनी यांनी चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी गोंदियाला कशाला जातात हे चालकाला माहीत होते. त्यामुळे त्याने कट रुचून त्यात सहा जणांना सहभागी करुन घेतले.
अशी केली हत्या
संजय सोनी 26 फेब्रुवारीला चालकाला घेऊन गोंदियाला गेले. कामे आटोपून ते रात्री गावी तुमसरला परत निघाले. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्या ठिकाणी चालकांचे तीन साथीदार आधीच थांबले होते. त्याने त्यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली.
हत्येचा बनाव उघड
हत्यानंतर संजय यांचा मृतदेह घेऊन हे सर्वच लोक संजय सोनी यांच्या निवासस्थानी गेले. घरी जाऊन त्यांनी साहेबांना भोवळ आल्याचे सांगितले. त्यानंतर संजय सोनी यांचा मुलगा ध्रूमिल याची गळा आवळून हत्या केली. त्यांची पत्नी पूनम सोनी यांचीही त्यांनी हत्या केली. तीन हत्या केल्यानंतर तिजोरीतील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी घेऊन चोरटे पसार झाले. मात्र जाण्यापूर्वी हे तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले अन् घरात दरोडा पडल्याचा देखावा केला. परंतु पोलिसांनी तपास करुन चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
हे आहेत आरोपी
या हत्याकांडातील ७ ही आरोपींना कलम 302, 394 सह विविध आरोपा खाली दोषी ठरविण्यात आले आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख (22), महेश आगाशे (26), सलीम पठाण (24), राहुल पडोळे (22), केसरी ढोले (22) रा.तुमसर, सोहेल शेख (26), रफीक शेख (42) रा.नागपूर यांचा समावेश आहे.
800 पानांचे आरोपपत्र
या हत्याकांड प्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला.