Nana Patole | ‘विजयकुमार गावित हा तर छोटा मासा, अनेक मोठे मासे भाजपात’, नाना पटोले यांचा मोठा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केलीय. विजयकुमार गावित यांच्या कन्येला सरकारी योजनेतून लाभ मिळाल्याच्या मुद्द्यावरुन पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्यांच्या टीकेवर भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
भंडारा | 15 सप्टेंबर 2023 : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित या केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. त्यांना योजनेसाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्वीट करत ही बाब उघड केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विजयकुमार गावित आणि भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. आता या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“भाजपनं जनतेच्या पैशाची लूट माजवलेली आहे. जनतेच्या पैशांच्या योजनांमधून आपलं घर कसं भरता येईल हे सुरु आहे. अशा पद्धतीत पैशांची लूट करणारे विजयकुमार गावित हे एकटेच नेते नाहीत. तर भाजपचे असे अनेक नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पोराचं हजार कोटीचं कर्ज माफ होतं”, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.
“ही जी काही प्रवृत्ती आहे ती भाजपची आहे. विजयकुमार गावित हा तर छोटा मासा आहे. असे अनेक मोठे मासे भाजपमध्ये आहेत. सत्तेच्या भरोशावर हजारो कोटी कमविले. यातून भाजप किती स्वार्थी आहे हे पाहायला मिळते”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांचा राज्य सरकारवर निशाणा
राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी औरंगाबादमधील फाईव्ह स्टार हॉटेल्स बुक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. सरकारच्या या कृतीवरही नाना पटोले यांनी टीका केलीय.
“फाईव्ह स्टार कल्चर असलेली बीजेपी, मराठवाड्याचं त्यांनी पानं पलटवून बघावं. आतापर्यंत जे मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादमध्ये झाली ती बैठक रेस्ट हाऊस आणि कमिश्नर ऑफिसला झाली. आता यांची ही मीटिंग होणार आहे, ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. ही फाईव्ह स्टार संस्कृती भाजपची आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“तुम्ही किती वर्ष काँग्रेसवर आरोप करणार आहात? आता महाराष्ट्रातील जनता तुम्हाला समजली, तुमचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते? त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही, तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात. केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काय केलं? याचा हिशोब द्या”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.