पतीच्या निधनानंतर खचली, त्यात कर्करोगाने गाठले; भंडाऱ्यातील महिलेने उचलले आत्मघाती पाऊल
दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. त्यानंतर कर्करोगाना गाठले. कर्करोगाला कंटाळून 50 वर्षीय महिलेने गोसे धरणात उडी घेतली.
तेजस मोहतुरे
भंडारा : सिंधू काशिनाथ गायमुखे (Indus Gaimukhe)असं मृतक महिलेचं नाव आहे. सिंधू या पवनी तालुक्यातील जुनोना (Junona ) इथल्या राहणाऱ्या. संसार सुखाचा गेला. पतीची सोबत होती. पण, गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांचे पती मरण पावले. त्यानंतर त्या खचल्या. त्यातच त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आधी पती कमवता असल्यानं खर्च करता येत होते. पण, आता पतीही देवाघरी गेले. त्यांनी अकाली एक्झीट घेतली. संसाराचे महत्त्वाचे चाक गळून पडले. हा रहाटगाडगा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांना पडला. गेल्या काही दिवसांपासून त्या चिंतेत होत्या.
उपचारासाठी नव्हते पैसे
कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यात उपचाराचा खर्च कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या मनाला नेहमी सतावत असे. त्यामुळं आत्मघाती निर्णय त्यांनी घेतला. घरून निघताना मी रुग्णालयात उपचारासाठी जाते, असे सांगितले. पण, सोबत पैसे नव्हते. मग, उपचार कशा घेणार. मन कठोर करून त्या गोसे धरणात गेल्या. सध्या धरणात पाणी पूर्णपणे भरलेले आहे.
धरणात घेतली उडी
धरण परिसरात पाणीच पाणी आहे. ज्या धरणाने त्यांना जगविले. धरणातील पाण्यावर निघणाऱ्या उत्पन्नाने जगविले. त्याच धरणात स्वतःचा देह त्यागण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अकरा फेब्रुवारी रोजी धरणात उडी घेतली. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. प्रितम काशिनाथ गायमुखे यांनी पवनी पोलिसांत तक्रार केली. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून त्या तणावात असल्याचे कुटुंबियांनी सांगितलं. सिंधू यांचे मन घरकामात लागत नव्हतं. नेहमी कर्करुग्ण असल्यानं त्याच त्रासात त्या असायच्या.