Bhandara | चार दिवस झाले आई मी जेवलो नाही! युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाने सांगितली व्यथा, आई फोडतेय हंबरडा
आई मी चार दिवस झाले जेवलो नाही. भुकेने व्याकुळ झालो. अशी व्यथा युक्रेनमध्ये अडकलेल्या भंडारा शहरातील प्रितेश पात्रे याने आपल्या आईसमोर व्यक्त केली. त्याची ही स्थिती बघून आई सतत हंबरडा फोडत आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : शहरातील प्रितेश पात्रे हा 2020 साली युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण (medical education) घेण्यासाठी गेला. तो विनेस्टिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान, त्याच्या आजीचे निधन झाले. त्याला आई-वडिलांनी परत घरी बोलवलं होतं. मात्र अचानकपणे युक्रेन आणि रशियामध्ये (Russia and Ukraine) युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली. त्याचे रिझर्वेशन कॅन्सल झाले. प्रितेश येऊ शकला नाही. अखेर रशिया आणि युक्रेनचे युद्ध पेटले. प्रितेश पात्रे (Pritesh Patre) तिथे अडकून गेला. त्याने ही माहिती आपल्या कुटुंबाला दिली. कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली. एकीकडे आई जाण्याचा दुःख तर दुसरीकडे मुलगा युक्रेनमध्ये अडकल्याची चिंता या दोन्ही परिस्थितीत पात्रे कुटुंब अडकले. मृतक आईचे विधीवत संस्कार पार पाडत होते. त्याचवेळी मुलाच्या संकटात सापडल्याचा टाहो पात्रे कुटुंबांना विचलित करत होता.
एकीकडं मुलाचा फोन बंद, दुसरीकडं आईचे अंत्यसंस्कार
आपण बंकरमध्ये आहोत, चार दिवस झाले जेवण मिळालं नाही. पाणी मिळालं नाही. अशा स्थितीत बंकर येथे जीवन व्यतीत करत आहोत. कधी आम्ही बाहेर निघू? अशा प्रकारचे मित्राच्या मोबाईलवरून केलेले मेसेजने आई-वडिलांच्या तोंडातला घास हिसकावून लावला. एकीकडे मुलाचा बंद फोन तर दुसरीकडे मृतक आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. अखेर आपण बॉर्डर क्रॉस करून रोमानियाच्या शेल्टर रूममध्ये सुखरूप पोहोचलो. चार दिवसांनंतर जेवण करायला मिळाले. हा मेसेज पात्र कुटुंबांना सुखावून गेला.
पाच कुटुंबीय पाहतात मुलाच्या परतीची वाट
अखेर प्रितेशचा नुकत्याच आलेल्या व्हिडीओ कॉलने पात्र कुटुंबाच जीवात जीव आला. लवकरच आपल्या काळजाच्या तुकड्याशी आपली भेट होणार आहे. त्यामुळं पात्रे कुटुंब आनंदात आहे. प्रितेशची घरी येण्याची वाट पाहत असल्याचे प्रितेशची आई कल्याणी पात्रे तसेच वडील धीरज पात्रे यांनी सांगितले. एकंदरित भंडारा जिल्ह्यातील एकूण पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले. पात्रे कुटुंबावर ओढवली तशीच परिस्थिती इतर चारही कुटुंबावर ओढावलेली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हे पाचही कुटुंब आपल्या मुलांना सुखरूप येण्याची वाट पाहत आहेत.