विरोधी पक्षनेतापदाचा निर्णय अधांतरी आणि ‘या’ मोठ्या पदाचा निर्णय
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. भाजपच्या बहुमतामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता सत्ता स्थापन झाली आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. पुढच्या दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल. तसेच विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान सत्ता स्थापनेनंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय निर्णय होईल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अधांतरी असताना आता आणखी एका मोठ्या पदाचा निर्णय होताना दिसत आहे. विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. राम शिंदे यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
भाजपकडे सध्या विधिमंडळात बहुमत आहे. दोन्ही सभागृहात महायुतीची सदस्य संख्या जास्त आहे. विधान परिषदेतही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. त्यामुळे राम शिंदे यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत.
राम शिंदे यांचं ट्विट काय?
“महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे”, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
बऱ्याच काळापासून सभापतीपद रिक्त
राज्याच्या विधान परिषदेत बऱ्याच काळापासून विधान परिषदेचं सभापती पदाची जागा रिक्त आहे. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूकच झाली नाही. अर्थात यामागे राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे. सातत्याने राजकीय उलथापालथ सुरु असल्याने सभापती पदाची निवडणूक होऊ शकली नाही. या दरम्यानच्या काळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज पाहिलं. यानंतर आता सभापती पदासाठी निवडणूक होत आहे. राम शिंदे यांची या पदावर निवड होण्याची दाट शक्यता आहे.