‘काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार’, सुजय विखे पाटील यांचा सर्वात मोठा दावा
भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी काँग्रेसबद्दल मोठं विधान केलंय. काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचं विधान सुजय विखे पाटील यांनी केलंय.
कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर : काँग्रेसचे (Congress) माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी केल्याची माहिती नुकतीच समोर आलीय. विशेष म्हणजे आशिष देशमुख यांनी दिल्लीत जावून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेत आपली उद्विग्नता व्यक्त केलीय. या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याशिवाय काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल अनेकदा चर्चा होतात. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण जसजशा घडामोडी घडत गेल्या तेव्हा काँग्रेसमधून एकाही आमदाराने बंडखोरी केलं नसल्याचं स्पष्ट झालं. पण तरीही वारंवार काँग्रेसबद्दल अशा अनपेक्षित चर्चा वारंवार समोर येतात. विशेष म्हणजे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं विधान केलंय. काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचं विधान सुजय विखे पाटील यांनी केलंय.
“काँग्रेसचे ठराविकच लोक मलिदा खात होते. जशी शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसफूस होती तशी काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. त्यांचे स्वतःचे मंत्री देखील आमदारांचे काम करत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहा, ही तर सुरुवात आहे. भविष्य काळात काँग्रेस पक्षामध्ये मोठा राजकीय भूकंप येईल. महाराष्ट्राची जनता ते पाहिल”, असं सूचक विधान सुजय विखे पाटील यांनी केलं.
सत्यजित तांबे यांच्याबद्दल सुजय विखे यांचं सूचक विधान
सुजय विखे पाटील यांनी यावेळी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरही प्रतिक्रिया दिली. सत्यजित तांबे यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी पक्षातून हकालपट्टी करण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली होती. तर सत्यजित तांबे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी भाजपकडे विनंती करु, असं विधान केलंय. या सगळ्या घडामोडींवर सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता प्रतिक्रिया दिलीय.
“अनेक मित्रपरिवार सगळ्यात पक्षात असतात. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांवर मी काय मार्ग दाखवला? हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र मी दाखवलेल्या मार्ग लोक अवलंबून करतील तसं बातम्यांमध्ये येईल. ज्यांना मार्ग दाखवला आहे त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसतील”, असं सूचक विधान सुजय विखे यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल नाव न घेता केलं.