निकालापूर्वी भाजप आमदाराची राजकीय संन्यासाची घोषणा, भाजपमधील असंतोषामुळे राजकीय स्फोट
maharashtra assembly election 2024: माध्यमांसमोर आपल्या मनातील भावना मांडताना दादाराव केचे म्हणाले, मी आता राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपचे काम करणार नाही आणि कोणत्याही पक्षात जाणार नाही. आता मी समाज कार्य करणार आहे. १९८३ पासून मी भाजपचे कार्य केले. त्यावेळी पक्षाला गावागावात नेले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपमध्ये मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या विद्यामान आमदाराने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. पक्षातील नेत्यांकडून झालेल्या आरोपामुळे व्यथित होऊन संन्यास घेण्याची घोषणा भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील विद्यामान आमदार आहे.
काय म्हणाले दादाराव केचे
माध्यमांसमोर आपल्या मनातील भावना मांडताना दादाराव केचे म्हणाले, मी आता राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपचे काम करणार नाही आणि कोणत्याही पक्षात जाणार नाही. आता मी समाज कार्य करणार आहे. १९८३ पासून मी भाजपचे कार्य केले. त्यावेळी पक्षाला गावागावात नेले. संघटना मजबूत केली. त्यामुळे २००९ मध्ये आमदार झालो. त्यानंतर २०१४ मध्ये पराभव झाला. परंतु पुन्हा २०१९ मध्ये निवडून आलो.
का घेणार राजकीय संन्यास
दादाराव केचे म्हणाले, आपल्यावर कारण नसताना वेगवेगळे चुकीचे आरोप केले गेले. यंदाही पक्षाने मला तिकीट दिले होते. परंतु वेळेवर मागे घेण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मान्य करत मी ती मागे घेतली. चार तारखेला पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी फॉर्म मागे घेतला. त्यानंतर मी नाराज नव्हतो. भाजप उमेदवारासाठी 27 सभा घेतल्या. अनेक मेळावे घेतले. परंतु आता चुकीचे आरोप झाले. मतदार संघात मी काम केले नाही, असे आरोप केले जात आहे. मी कामे केली नसती तर निवडून येऊ शकलो नसतो. तसेच काम केले नसती तर मेळावे कशाला घेतले असते. आजही गावागावात माझे कार्यकर्ता आहेत. आपल्यावर होणारे आरोप पाहून वाटते, अर्ज मागे नसता घेतला, उभाच राहलो असतो तर बरे झाले असते.
मला विधासभेचे तिकीट मागे घेण्यास सांगितले तेव्हा विधान परिषद कबूल केली होती. पण काय भरवसा आहे. जवळपास ४२ वर्ष आर्वी मतदारसंघात कामे केली. आता माझे वय ७१ वर्ष झाले. आता थांबण्याचा निर्णय घेतला, असे आमदार केचे यांनी सांगितले.