‘कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो’, भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांची जाहीर माफी
कुणाच्या भावना दुखवल्या असतील माफी मागितली आहे. तसेच आपला उद्देश कुणाचा भावना दुखवण्याचा नव्हता, असं स्पष्टीकरण भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिलं आहे. भारतीय यांनी आपली कालची फेसबुक पोस्ट डिलीटही केली आहे.
भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्या घरात एक पाळीव कुत्रा आणला. त्यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली. आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन श्वान आणलं असून त्याचं नाव शंभू असं ठेवलं, असं श्रीकांत भारतीय यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या या पोस्टवर मराठा संघटनांकडून आक्षेप घेण्यात येत होता. त्यांनी आपल्या घरच्या पाळीव कुत्र्याचं नाव शंभू ठेवल्याने वाद निर्माण झाला. अखेर वाद जास्त वाढू नये यासाठी श्रीकांत भारतीय यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी कुणाच्या भावना दुखवल्या असतील माफी मागितली आहे. तसेच आपला उद्देश कुणाचा भावना दुखवण्याचा नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘प्राणीतत्वामध्ये ईश्वर बघण्याची आपली संस्कृती’
“नमस्कार! काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गुरु दत्तात्रयाचे वाहन श्वानाचे घरी आगमन झाले. प्राणीतत्वामध्ये ईश्वर बघण्याची आपली संस्कृती आणि शिकवण! ‘शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो’ यातूनच हे नाव ठेवावं असा विचार आला. आम्ही दत्तात्रयाचे उपासक !! श्वान हे त्यांचं वाहन !!! स्वाभाविकपणे घर धार्मिक !!! म्हणून हे नाव. पण दुर्दैवाने याचा विपर्यास केला गेला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचा प्राण आहे”, असं श्रीकांत भारतीय म्हणाले.
‘माझी पवित्र भावना समजून घ्या’
“आम्ही 4 पिढ्या वारकरी आहोत. या जन्मात तर आहेच. पण जन्मोजन्मी धर्मवीर संभाजी महाराज हे आमचे दैवत राहील. तथापि मी एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ता आहे. गैरसमजातून सुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. त्यांची क्षमा मागतो. पण या मागची माझी पवित्र भावना समजून घ्यावी, अशी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय”, अशी भूमिका श्रीकांत भारतीय यांनी मांडली आहे.
श्रीकांत भारतीय यांच्याकडून कालची पोस्ट डिलीट
दरम्यान, श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टवर सोलापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी संबंधित पोस्ट डिलीट करण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत भारतीय यांना ताकीद द्यावी, पोस्ट डिलीट करा अन्यथा राज्यातील शंभूप्रेमी त्यांच्या कुत्र्याला देवेंद्र, नरेंद्र नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असं मराठा समन्वयक माऊली पवार म्हणाले होते. त्यानंतर श्रीकांत भारतीय यांनी संबंधित पोस्ट डिलीट करत भूमिका मांडली आहे.