ठाणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची सेवा ठप्प, हार्बर लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल
ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी तुंबले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ आणि हर्बर मार्गावर रुळावर पाणी भरलं आहे.
ठाणे | 19 जुलै 2023 : ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी तुंबले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ आणि हार्बर मार्गावर रुळावर पाणी भरलं आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे उशिराने धावत असल्याने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. कर्जत अंबरनाथ आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलीय. तशा प्रकारची उद्धघोषण रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रशासनाकडून केली जाते आहे. सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
कल्याणमध्ये पाणी भरलं
कल्याणमध्ये गेल्या तासाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊसामुळे कल्याण स्टेशन परिसरातील गुरुदेव हॉटेल, बैल बाजारकडे जणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत सुरू आहे.
हार्बर उशिराने
दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यात अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.त्यामुळे प्लँटफॉर्मवर रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणत गर्दी झाली आहे. कामावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना रेल्वे उशिराने येत असल्यामुळे कार्यालयात पोहचण्यास उशीर होत आहे.
रायगडमध्ये रेड अॅलर्ट
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे असे परिपत्रक देखील काढण्यात आलं आहे. सावित्री, कुंडा, पात्रगंगा, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार हजेरी
मुंबई उपनगरात सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह सर्वच भागात पाऊस पडत आहे. सध्या कुठेही पाणी साचलेले नाही, मात्र असाच जोरदार पाऊस सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. अंधेरीच्या मिलन सबवे परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासन या परिसरावर नजर ठेवून आहे.
भाजीपाला फेकण्याची वेळ
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात साचले पावसाचे पाणी आहे. भिवंडीतल भाजी मंडईत गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजी मार्केटमध्ये दैना उडाली आहे. तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
रस्ता पाण्याखाली
वसई, विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागात दुपारी 11 नंतर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क, असोवाल नगरी, निलेमोरे गाव, आचोळा, वसईतील सनसिटी, नवजीवन, विरार पश्चिम आणि विवा कॉलेज येथील रस्ता पाण्याखाली गेला आहे.
सर्व सेवा ठप्प
मुसळधार पावसामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. तीन किलोमीटरच्या रांगाच रांगा या महामार्गावर लागल्या आहेत. पावसामुळे मूठा नदी पूल परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. नदी पुलापासून ते नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक, चाकरमानी, कामगार आणि विद्यार्थी चांगलेच हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतुक कोंडी मुळे ठप्प झाली आहे.