स्पेशल रिपोर्ट : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मंचावर येणार!
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावीत नव्या इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, सरन्यायाधीश चंद्रचूड एकत्र येणार आहेत. दरम्यान यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावीत इमारतीच्या भूजी पूजनासाठी शिंदे आणि सरन्यायाधीश चंद्रचूड एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आहे. त्यामुळे शिंदे आणि चंद्रचूड यांच्या एका मंचावर येण्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिंदेंची शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावरुनही निवडून आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुप्रीम कोर्टात गेलेत. दरम्यान हे प्रकरण देखील सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्यासमोरच आहे. विशेष म्हणजे चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरुन 8 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान 10 नोव्हेंबरच्या नंतरच होईल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे 8 नोव्हेंबर निवृत्ती होण्याआधीच सत्तासंघर्ष तसेच शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी मोदी चंद्रचूड यांच्या घरी गेले होते, आणि आता चंद्रचूड आणि शिंदे एकत्र येत असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय. न्यायालायच्या इमारतीच्या भूमिपूजनात राजकारण आणू नये, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पा आणि गौरीच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर मविआच्या नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या नवीन संकुलात कोणकोणत्या सुविधा असणार आहेत, त्यावर एक नजर टाकुयात.
उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलात काय-काय असणार?
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे 23 सप्टेंबरला अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. काळानुरूप मुंबई उच्च न्यायालयाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशा इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह असणार आहेत. बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा देखील उपलब्ध असतील.
एकीकडे 23 सप्टेंबरला सरन्यायाधीश चंद्रचूड आणि शिंदे एका मंचावर येणार आहेत. मात्र, दुसरीकडे 24 तारखेला आमदार अपात्रेतबाबत चंद्रचूड यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे चंद्रचूड आणि शिंदेंच्या एका मंचावर येण्यावरुन चर्चा सुरु झाली आहे.