Mumbai : राज्यातलं सरकार काँग्रेसच्या जीवावर, 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत-भाई जगताप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावं. असं वक्तव्य केले आहे.
मुंबई : राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे कित्येकदा महाविकास आघाडीतील धुसपूस बाहेरही आली आहे. काँग्रेसची नाराजी याआधीही अनेकदा दिसून आली आहे. कधी निधीच्या वाटपावरून तर कधी नामांतरांच्या मुद्यावरून तर कधी अन्य मुद्द्यावरून अनेकदा मतभेद झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसला किती महत्व आहे? असे सवालही उपस्थित केले गेले, त्यावर काँग्रेस नेते अनेकदा राज्यातले सरकार काँग्रेसशिवाय नाही, असे अनेकदा सांगताना दिसून आले.
राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर
या मुद्द्यावर बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावं. असं वक्तव्य केले आहे. तसेच 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर येणार आहेत. सोनिया गांधींनाही आमंत्रण दिले आहे आणि विनंती केली आहे की त्यांनी शिवाजी पार्कच्या सभेत यावे अशी माहितीही भाई जगताप यांनी दिली. याशिवाय भाजपवर बोलताना, या देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. याचा मुकाबला स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने केला आणि आता भाजप विरुध्द लढून करत आहे. आम्ही आरएसएसचा अजेंडा देशात राबवूनदेणार नाही. असंही भाई जगताप म्हणालेत.
सेनेच्या यूपीए प्रवेशाबाबत काँग्रेस नेते ठरवतील
यूपीएमध्ये शिवसेनेला घ्यायचे का? हे मी ठरवू शकत नाही काँग्रेसचे नेते ठरवतील. असंही भाई जगताप म्हणालेत. तसेच आरक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नाही अशी तोफही भाई जगताप यांनी डागली आहे. तसेच देशात ओमिक्रॉन पसरत असताना पंतप्रधान सभा घेत आहेत, निवडणुका होत आहेत. हे वेळीच थांबले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान
तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. त्याबाबत भूमिका मांडताना भाई जगताप म्हणाले, कंगना रणावतला पद्मभूषण पुरस्कार मिळत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हवे, ही तोगडिया यांची मागणी असेल मला माहित नाही, असंही ते म्हणाले.