‘मी राजीनामा द्यायला तयार’, मारकडवाडी गावात जावून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
"आता या लोकांना मताची भीती राहिली नाही. त्यामुळे हे लोक आता राज्य विकतील. मात्र आता माझ्या मतांचा अधिकार शाबूत राहिला पाहिजे. मी 1 लाखाने निवडून येणार होतो. पण ते 2 हजारावर आले. त्यामुळे मी, उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार आहोत", असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात जावून गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गावकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर आपण राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं नाना पटोले म्हणाले. “मारकडवाडीतील ग्रामस्थांना सलाम करायला इथे आलोय. पाकिस्तान, श्रीलंका या देशातील लोकशाही संपुष्टात येत आहे. आमच्या देशात पण EVM द्वारे आमचे मत चोरून चालले आहे. निवडणुका झाल्या की आयोग पत्रकार परिषद घेतो. मात्र यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही. आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी तोडकीमोडकी उत्तरं दिली. त्यांनी रात्री 11 पर्यंत मतदान झाले, असे सांगितले मग त्याबाबत आम्ही व्हिडीओ मागितले. ते देखील आयोगाने दिले नाहीत”, असं नाना पटोले म्हणाले.
“चोर के दाढी में तीनका अशी म्हण आहे. अर्थात मी मोदींच्या दाढीबाबत बोलत नाही. हा आवाज जनतेने उचलला आहे. राजकीय नेत्यांनी उचलला नाही. आज काही लोक गावात येऊन काही बोलले. हे पेशवाईतील लोक आहेत. त्यावर अधिवेशनात बोलतो. मारकडवाडीवर विधानसभेत चर्चा घ्या, अशी मागणी केली. मात्र त्यावर ते बोलले नाहीत कारण त्यांना तुमच्यावर राग आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
“एका आमदाराला अजून विश्वास नाही कारण ते म्हणतात मलाच माहिती नाही मी कसा निवडून आलो. 2014 पर्यंत या देशावर 55 लाख कोटींचे कर्ज होते, ते आता 220 लाख कोटींचे झाले. पूर्वी शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर घेतला जात नव्हता. पण आता हे शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर वसुल करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे काँग्रेसने स्वीकारली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे कायम समर्थन केले”, असं नाना पटोले म्हणाले.
‘मी राजीनामा द्यायला तयार’
“उत्तर प्रदेशात भाजपने आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. आता या लोकांना मताची भीती राहिली नाही. त्यामुळे हे लोक आता राज्य विकतील. मात्र आता माझ्या मतांचा अधिकार शाबूत राहिला पाहिजे. मी 1 लाखाने निवडून येणार होतो. पण ते 2 हजारावर आले. त्यामुळे मी, उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार आहोत. आपल्या गावातील माती बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या चरणावर राहुल गांधी ही माती वाहणार आहेत. महात्मा गांधी यांच्याप्रमाणे मताच्या अधिकाराबाबत जी चळवळ होईल ती मारकडवाडीतून होईल अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत लवकरच वेळापत्रक तयार होईल”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“स्वातंत्र्यपूर्व चळवळीत इंग्रजांच्या तुकडीत भारतीय सैनिक होते. त्यात देखील मंगल पांडे तयार झाले. आमच्या पोलिसात मंगल पांडे व्हावेत अशी अपेक्षा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढे येत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय. जर आमचे सरकार आले असते आणि अशी मागणी झाली असती तर आम्ही ती मान्य केली असती. आपल्याला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. कारण हे लाथांचे भूत आहेत ते बाताने मानणार नाहीत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“मारकडवाडीतील लोकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील. अन्यथा याचे परिणाम आगामी काळात चांगले होणार नाहीत. मला अपेक्षा आहे की हे गुन्हे मागे घेतले जातील. निवडणूक आयोगाने पोर्टल बंद केले याचा अर्थ काहीतरी घोळ आहे. मी सकाळी येणार होतो पण अतिक्रमण झाले. त्यामुळे मला यायला वेळ झाला”, असं नाना पटोले म्हणाले.