Corona RTPCR Test | आता कोरोनाची RTPCR चाचणी 350 रुपयात, दर पुन्हा एकदा कमी; राज्य सरकारचा निर्णय
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार आहेत, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार आहेत, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील जारी करण्यात आलाय.
350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले.
कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही
आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 350 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वॉरन्टाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 500 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी 700 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
तीन टप्प्यात दर ठरवण्यात आले
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 300, 400, 500असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी 1200 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने खर्च कमी झाला
या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या :
Omicron : मुंबईतील दोघांना ओमिक्रॉनची लागण, राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर, चिंता वाढली!
Obc : ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचं षडयंत्र, फडणवीसांचे लोक कोर्टात का जातात? भुजबळांचा सवाल