शिवसेनेची निवडणूक आयोगातील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आलेली असताना एक मोठी बातमी
केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आल्याचं चित्र असताना एक मोठी बातमी समोर आलीय.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून प्रत्यक्ष आणि लेखी स्वरुपात युक्तिवाद करण्यात आलाय. त्यानंतर आता निवडणूक आयोग महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याच सुनावणी विषयी सर्वात महत्त्वाची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेची सुरु असलेली सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोग आता सुप्रीम कोर्टाच्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.



सुप्रीम कोर्टात 16 आमदारांचा अपात्रतेच्या मुद्दे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुनवाणी सुरु आहे. या प्रकरणी येत्या 14 फेब्रुवारी पुढची सुनावणी होणार आहे.
या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाविषयी निकाल देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल पुन्हा आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
दोन्ही गटाच्या वकिलांचा जबरदस्त युक्तिवाद
केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटाच्या वकिलांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड युक्तिवाद केलाय. “आमच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. आमच्याकडे आमदार-खासदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष आणि नावावर आमचाच हक्क आहे”, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात केला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वकिलांनी सुरुवातीला अतिशय आक्रमक पद्धतीने भूमिका मांडत शिंदे गट हीच मुख्य शिवसेना असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी याआधी घडलेल्या काही प्रकरणांची उदाहरणे दिली होती.
दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांनी शेवटच्या दोन दिवसांच्या सुनावणीवेळी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडली. प्रतिनिधी सभा, पक्षाची घटना पासून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी प्रकाश टाकला. त्यामुळे निवडणूक आयोगात ठाकरे गटाचे पारडे जड होताना दिसले.
दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला जातोय. या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडायला लावला होता. त्यानुसार दोन्ही गटाने लेखी म्हणणं मांडलं आहे. त्यानंतर आता अंतिम निकालाची प्रतिक्षा आहे.
…तर ठाकरे गटाला दिलासा
विशेष म्हणजे ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या पक्ष आणि नावाबद्दल महत्त्वाची मागणी केलीय. जोपर्यंत 16 अपात्र आमदार आणि या प्रकरणाशी संबंधित विषयाच्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. निवडणूक आयोगाने तसाच निर्णय घेतला तर हा ठाकरे गटाला दिलासा असेल.
…तर शिंदे गटाला धक्का
ठाकरे गटाची ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केल्यास एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा धक्का असेल. कारण शिंदे गटाने सर्वाधिक लोकप्रतिनिधी आपल्याकडे असून या विषयी स्पष्ट बहुमत शिंदे गटाच्या बाजूने आहे. त्यामुळे याबद्दल आयोगाने लगेच निकाल द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी तो धक्का असल्याचं मानला जाईल.