ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलनाचे होणार काय, मुख्य मंडपाची आसनक्षमता 14 हजार, बाका प्रसंग उद्भवला…!
जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे साहित्य संमेलनाचे काय होणार, असा बाका प्रसंग निर्माण झाला आहे.
नाशिकः जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे साहित्य संमेलनाचे काय होणार, असा बाका प्रसंग निर्माण झाला आहे. एकीकडे साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. भव्यदिव्य मंडप टाकण्यात येत आहेत. वाद-रुसवे फुगवे जोडीला आहेतच आहेत. मात्र, संमेलनाला अजूनही चार दिवस आहेत. तोपर्यंत काहीही होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुख्यमंडपाची क्षमता 14 हजार
आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यात मुख्य सभामंडपाची आसन क्षमता 14 हजार आहे. ती नव्या नियमाप्रमाणे आता 7 हजार करावी लागणार आहे. सुरक्षित अंतराचे पालन करावे लागणार आहे. निमंत्रकांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे. तसे नियोजन असल्याचे ही सांगितले आहे. संमेलनासाठी राज्य भरातून लोक येणार. आता मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून काही जण आले आहेत. त्याचे सावटही या संमेलनावर राहणार आहे.
अँटीजन टेस्ट, मास्क
साहित्य संमेलन स्थळी अँटीजन चाचणी करण्याची सोय करावी लागेल. प्रत्येकाला मास्कशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. प्रत्येकाचे स्क्रिनिंग करावे लागेल. या साऱ्याचे नियोजन झाल्याचे निमंत्रक म्हणत आहेत. मात्र, ते व्यवस्थित पार पडणार का, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. शिवाय एकाच ठिकाणी फक्त एका मंडपात 7 हजार लोक उपस्थित राहिल्यानंतर आपल्या इकडील शिस्तीप्रमाणे सारे काही चालणार. शिवाय इतर वेगवेगळ्या मंडपातही शेकडो जण असणार. त्यांना नियमांची सक्ती कशी करायची, असा प्रश्न आयोजकांसमोर राहणार आहे.
लस प्रमाणपत्राची सक्ती करावी
सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूवर फक्त एकावर एक दोन मास्क घालणे, लसीकरण हाच पर्याय उपलब्ध आहे. साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी निमंत्रक करणार का आणि करायची झाल्यास तितकी सुविधा उपलब्ध आहे का, असा प्रश्न आहे. अनेक व्यासपीठासमोर साहित्य संमेलनाचे कार्यक्रम होणार. त्यात भोजनावळी वेगळ्याच. हे पाहता ही गर्दी कशी रोखायची, असा प्रश्न आयोजकांसमोर असेल. त्यात नव्या विषाणूचे सावट. आता नियमबदल करून सरकारने संमेलन रद्द करण्याची घोषणा करू नये म्हणजे झाले.
नाशिकमध्ये पाचशेच्या घरात रुग्ण
सध्याच नाशिक जिल्ह्यात पाचशेच्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत. सिन्नर, निफाड तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात कोणीही कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मग हे नियम पालन साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राज्य भरातून आलेल्या लोकांंना करायला लावणे शक्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
इतर बातम्याः
संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?