कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सुविधा कशी मिळणार?
बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षावधी असते. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाड्या देण्यात आल्या आहेत. बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. (Toll waiver for those going to Konkan for Ganeshotsav)
कोकणात आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गावर टोल माफ केला जाईल. टोलमाफीसाठी स्टिकर पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी चाकरमान्यांना आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. गणेश आगमनाच्या दोन दिवस आधीपासून टोल माफीला सुरुवात होईल. त्यानंतर गणेश विसर्जनानंतर दोन दिवसांपर्यंत ही टोल माफी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन, खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी आज बैठक झाल्याची माहिती शिंदे यांनी देली. कोकण मार्गावर टोल सवलत दिली जाणार आहे. टोल स्टिकर देण्याबाबत आज निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जाणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग प्रशासनाकडून खबरदारी
गतवर्षीच्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमन्यांनी यंदा आठवडाभराअगोदरच गावी जाण्याची तयारी सुरु केली आहे. पण कोरोनाचं संकट लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत. चाकरमन्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी केली जाईल मगच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमेवर आजपासून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या आरोग्य पथकांद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि चाचणी करण्यात येणार आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी करून 72 तास व्हायच्या आधी आलेल्या प्रवाशांना तपासणी शिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना चाचणीसाठी चेकपोस्ट
अन्य सर्व प्रवाशांची सीमेवर रॅपिड टेस्ट करूनच मग प्रवेश दिला जाणार आहे. कणकवली तालुक्यात 10 आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली असून खारेपाटण चेकपोस्टवर सहा, फोंडाघाट चेकपोस्टवर दोन व कणकवली रेल्वे स्थानकात दोन पथके सज्ज झाली आहेत.
तसेच सावंतवाडी तालुक्यातील आंबोली व वैभववाडी तालुक्यातील करूळ या सीमेवरील चेकपोस्टवर ही आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.आजपासून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची नोंद ठेवून चाचणी व तपासणी या आरोग्य पथकांकडून करण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’
Toll waiver for those going to Konkan for Ganeshotsav