कुणाला कुठले मंत्रिपद हेही ठरलेले, काँग्रेस तयार झाल्यावर पवारांनी शब्द फिरवला-गिरीश महाजन
शरद पवार हे आता अर्धसत्य सांगत आहेत, शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.
पुणे : शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवरून राज्यात पुन्हा पाहटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावर महाविकास आघाडीकडून फक्त संजय राऊत बोलले असले तरी भाजप नेत्यांकडून मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर भाजप आणि राष्ट्रवीत काय बोलणी झाली? सत्ता स्थापनेसाठी काय फॉर्म्युला ठरला होता? पवारांनी शब्द का फिरवला? अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत
शरद पवार हे आता अर्धसत्य सांगत आहेत, शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत. एवढेच नाही तर या बैठकीत कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं, पण जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काय बोलणं झालं?
गिरीश महाजन यांना अजित पवार आणि फडणवीस यांच्या काय चर्चा झाली? असे विचारले असता, पहाटेच्या शपथविधी वेळी मी ही सोबत होतो, पण त्यावेळी अजित पवार आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, असे उत्तर गिरीश महाजन यांनी दिले आहे. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हा पाहटेचा शपथविधी फडणवीस आणि अजित पवारांची पाठ सोडत नाही, पुन्हा एकदा त्यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भाजपच्या आरोपांना शरद पवार काय उत्तर देणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.