गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामाला वेग; कार्यालय तातडीने सुरु करण्याचे धनंजय मुंडेंचे निर्देश
ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आदेश देऊन तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून सुरू करावी. तसंच ती माहिती साखर कारखाने यांच्याकडूनही उपलब्ध करावी, असंही मुंडे यांनी सांगितलं आहे.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती देण्यात आलीय. महामंडळाचे कार्यालयही तातडीने सुरू करावे असे निर्देश धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत. पुणे आणि परळी वैजनाथ या दोन ठिकाणी महामंडळाचे कार्यालय असणार आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आदेश देऊन तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून सुरू करावी. तसंच ती माहिती साखर कारखाने यांच्याकडूनही उपलब्ध करावी, असंही मुंडे यांनी सांगितलं आहे. (Gopinath Munde Sugarcane Workers Welfare Corporation’s work speed)
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला गती देऊन संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात आज मुंडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि परळी येथे महामंडळाचे कार्यालय सुरू करावे. त्यासाठी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसंच कार्यालयात लागणारे अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करून घ्यावेत असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
वसतिगृह योजनेची अंमलबजावणी
गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या 20 वसतिगृहांसाठी इमारती उपलब्ध करण्यासाठी संबंधित जिल्हा स्तरावर जाहिराती प्रसिद्ध करून इमारती उपलब्ध करून घ्याव्यात. तसंच प्रति वसतिगृह 100 विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक अन्य सामग्री खरेदी करावी, असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या मुलांना नामांकित शाळा/महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी देखील मदत करण्यात येणार आहे.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास भागभांडवल खर्चासाठी नुकताच मंजूर केलेला निधी महामंडळाच्या लेखाशीर्षात वर्ग करून वरील कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शरद आरोग्य वाहिनी, ऊसतोड कामगार अपघात विमा योजना आदी काही कल्याणकारी योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत, या योजनांचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे लवकर पाठवण्यात यावा असंही मुंडे म्हणाले.
संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या रचनेमध्ये संचालक मंडळ, तसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. संचालक मंडळात धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजित कदम, समाज कल्याण आयुक्त, साखर आयुक्त, कामगार आयुक्त हे पदसिद्ध सदस्य असतील. तसंच ऊसतोड कामगारांच्या काही प्रतिनिधींची देखील यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असल्याचं यावेळी मुंडे म्हणाले.
Video | 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 4 August 2021#News | #NewsUpdate | #SuperfastNewshttps://t.co/y3ZesyC8UM
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2021
इतर बातम्या :
Gopinath Munde Sugarcane Workers Welfare Corporation’s work speed