हिंगणघाट जळीतकांडाविरोधात पालकमंत्री सुनील केदार यांचं उपोषण
हिंगणघाट जळीतकांडाविरोधात वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार आज उपोषणाला बसले आहेत.

वर्धा : हिंगणघाट जळीतकांडांतील 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर आज वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी या घटनेच्या निषेधार्थ आत्मचिंतन आणि सामूहिक उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या या उपोषणात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे उपोषण सलग 12 तास सुरु राहणार आहे (Hinganghat Teacher Burn Case).
महिलांचा सन्मान हा फक्त शाब्दिक नसून तो कृतीत अमलात यायला पाहिजे, त्यामुळे आपण हे उपोषण करत असल्याचे स्पष्टीकरण सुनील केदार यांनी दिलं. याशिवाय “आत्मचिंतन आणि लोकांमध्ये प्रबोधन हा महत्त्वाचा विषय आहे. लोकप्रबोधनाच्याच माध्यमातून क्रांती घडू शकते. लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सुविचार येऊ शकतात, लोकप्रबोधनाच्या माध्यमातूनच अन्यायाविरोधात आपण लढाई करु शकतो”, असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला.
“मी 12 तासांसाठी उपोषणाला बसणार आहे. या देशातील जनतेने ज्या विचारधारेला पूर्ण रुप देऊन ताकद कशी असते हे दाखवून दिलं आहे तिच विचारधारा धरुन चालण्याचा माझा प्रयत्न आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी देशासाठी जे विचार दिले त्या विचारांनी समाजाला ताकद दिली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या या विचारांना उजळणी देण्याच्या माझा प्रयत्न आहे”, असेदेखील सुनील केदार यांनी सांगितलं.
वर्धा जिल्ह्याच्या दारोडा गावातील एका 24 वर्षीय प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. तब्बल आठ दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला (Hinganghat Teacher Burn Case).