Unmesh Patil : राज्यात आघाडी सरकार अपघाताने आले, तर गुलाबराव पाटील हे ॲक्सिडेंटल मिनिस्टर; उन्मेष पाटलांची टीका
Unmesh Patil :जळगावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जळगाव: भाजपचे खासदार उन्मेष पाटील (unmesh patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (shivsena) नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्यावर टीका केली आहे. गुलाबराव पाटील हे अपघाताने मंत्री झाले असून हे आघाडी सरकार देखील अपघाताने आले आहे. त्यामुळे याचा यांनी फायदा करून घ्यावा व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कपाशी, केळी, मका यासारख्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देत आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभी राहिलो. मात्र महा विकास आघाडी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील या बाबत बोलायला तयार नाहीत. त्यामुळे दुर्देवाने जिल्हा विकासापासून दूर जात असल्याचा आरोपही खासदार पाटील यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे रविवारी जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. नदी-नाले भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले होते. तर दुसरीकडे स्थानिक नगरपंचायतच्या वतीने कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं चित्रं यावेळी दिसत होतं. त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात होता. तर वादळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उन्मेष पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
पंचनाम्यासाठी आठ दिवसांची मुदत
जळगावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. मात्र पालकमंत्र्यांनी केलीली पाहणी म्हणजे देखावा असून दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री शेतकऱ्यांना पीक बदलण्याचा सल्ला देतात. मात्र याबाबत उपाययोजना केल्यास पीक न बदलताच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, त्यासाठी पालकमंत्र्यांना अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी करत उन्मेष पाटील यांनी पंचनाम्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे.
यापूर्वीही टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेतली होती. त्यासभेवरही उन्मेष पाटील यांनी टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकल्यानंतर खेद वाटतो. मुख्यमंत्र्यांचे भाषण होते की कार्यकर्त्येचं भाषण आहे हा प्रश्न आहे. कोणतेही व्हिजन नाही, राज्य पुढे नेण्यासाठी कोणताही प्लॅन नाही. ऊस घेतला जात नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. काही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. कोरोनामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी माफ केलं. पण यापुढे तुम्हांला जनता माफ करणार नाही, असं पाटील म्हणाले होते.