हातकणंगलेमध्ये मोठा राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मतदान काही काळासाठी थांबवले
Hatkanangale Lok Sabha constituency: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात काही ठिकाणी गोंधळ, हाणमारी, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली. वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.
काय घडला प्रकार
वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बुथ क्रंमाक 62 आणि 63 वर हा प्रकार घडला आहे. महायुतीचे उमेदवार धर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात जोरात बाचाबाची झाली. त्याचे रुपातंर जोरदार हाणामारीत झाले. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर याचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले. दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.
पोलिसांचा हस्तक्षेपामुळे वाद टळला
दोन्ही गटातील वाद वाढू लागल्यानंतर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला. यामुले पुढील मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप केल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू आहे. धर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हातकणंगले मतदार संघात तिरंगी सामना
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणूक रिंगणात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी उमेदवार आहेत. महायुतीकडून धीर्यशील माने तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर उमेदवार आहेत.