BREAKING : राजकारण महाराष्ट्राचं, दिल्लीत वेगवान घडामोडी, धनु्ष्यबाणाचा आज अंतिम फैसला होणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission Of Maharashtra) सर्वात महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission Of Maharashtra) सर्वात महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी सुरु आहे. मध्यंतरी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटासाठी (Thackeray Group) वेगवेगळे चिन्ह आणि नावं जाहीर केली होती. पण ती नावं आणि चिन्ह तात्पुरता स्वरुपाची होती. आता दोन्ही गटाच्या मागण्या आणि दावे-प्रतिदावे या सर्व गोष्टींचा विचार करता निवडणूक आयोगाची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. दोन्ही गटाकडून या सुनावणीसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय. ठाकरे गटाचे तीन दिग्गज नेते या सुनावणीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. अतिशय वेगाने सर्व घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रासाठी ही सुनावणी फार महत्त्वाची आहे. कारण या सुनावणीत जो निकाल लागेल त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे तीन दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये अनिल देसाई, अनिल परब आणि संजय राऊत यांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देसाई आणि अनिल परब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला कदाचित संजय राऊत हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण ते अद्याप निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाताना दिसलेले नाहीत. दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज सकाळी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात हजर होते, अशी देखील माहिती समोर आलीय.
दोन्ही गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गट आक्षेप घेणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गट आक्षेप घेणार आहे.
शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात जवळपास साडेचार लाख प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. पण हे सगळे प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
ठाकरे आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि दोन्ही गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात आले आहेत. अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. या सुनावणीत नेमकं काय घडतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.