Nagar Panchayat Election: हिंगोलीत 3 तर बीडमधील 6 पालिकांची मुदत आज संपणार, प्रशासकाची नियुक्ती!
मराठवाड्यातील 45 नगरपालिकांची मुदत येत्या तीन महिन्यात संपतेय. यापैकी हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील नगरपंचायतींची मुदत आज 29 डिसेंबर रोजी संपणार आहे. याठिकाणी आज प्रशासकांची नेमणूक केली जातेय.
कोरोना संकटामुळे नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवर घेऊ शकत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपंचायतींमध्ये मुदत संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 29 डिसेंबरला हिंगोली जिल्ह्यातील तीन पालिकांची तसेच बीडमधील 6 नगरपालिकांची मुदत संपतेय. त्यानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत आहे.
कोणत्या नगरपालिकेची मुदत संपणार?
– हिंगोली नगरपालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे काम पाहतील. – वसमत पालिकेचे प्रशासक म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे, कळमनुरी पालिकलेचे प्रशासक म्हणून तहसीलदार सुरेखा नांदे काम पाहतील. – बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, बीड, माजलगाव, परळी, गेवराई आणि धारूर या सहा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त केले जातील.
या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत बुधवारी संपणार आहे. या मुदतीपूर्वी निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग रचना व इतर कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. त्यामनुळले आता पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या कोणत्या नगरपंचायतींची मुदत संपणार?
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड नगर परिषदेची आणि पैठण नगर परिषदेची मुदत 16 जानेवारी 2022, गंगापूर नगर परिषदेची 15 जानेवारी 2022 आणि खुलताबाद नगर परिषदेची 21 जानेवारी 2022 रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे या संस्थेवर संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त होणार आहेत. तर जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतूर या नगर परिषदांची मुदत 25 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. या सर्व नगरपरिषदांवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर बातम्या-