ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक, मतदानाला 6 दिवस बाकी असतानाच हिंगोलीत वातावरण तापलं
मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना हिंगोली जिल्ह्यात वातावरण तापलं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथील वाकोडी गावात प्रचारासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या वाहनांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आता जसजसं जवळ येत आहे तसतसं आता वातावरण तापताना दिसत आहे. त्याचं ताजं उदाहरण हिंगोलीत बघायला मिळत आहे. हिंगोलीत प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे यांनी दिली आहे. हिंगोलीत कळमनुरी तालुक्यात ही घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी संबंधित गाड्या या वाकोली गावात पोहोचल्या होत्या. यावेळी प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर जोरदार दगडफेक झाली.
या घटनेनंतर कळमनुरी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफे आणि जिल्हाप्रमुख गोपू पाटील हे देखील कार्यकर्त्यांसह कळमनुरी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाला बसले आहेत. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी संतोष टारफे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
आमचे दोन-चार मुलं अद्यापही बेपत्ता, संतोष टारफे यांचा दावा
“वाकोडीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता, तिथे जवळपास 2 हजार महिलांना जमवून हेच विरोधी पक्षवाले त्यांना पैसे वाटत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली. ती लोकं त्यावरच थांबली नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना त्या लोकांनी मारहाण केली. त्यांच्या गाड्या फोडल्या. आमचे दोन-चार मुलं अद्यापही बेपत्ता आहेत”, असा दावा संतोष टारफे यांनी केला आहे.
“आम्ही सकाळी ऑब्जर्व्हरला सांगितलं की, तिथे पैसे वाटत आहेत, तुम्ही कारवाई करा. ऑब्जर्व्हरने एसपीला सांगितलं, एसपीने पीआयला सांगितलं, 112 नंबरवर फोन केले, तरी कोणतीही कारवाई झाली नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी तिथे जावून सांगितलं की, असे पैसे वाटणे बरोबर नाही. तेव्हा त्याच्यासोबत झटापटी झाली. त्यांना मारहाण केली. या घटनेत आमची काही माणसं जखमी सुद्धा झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे प्रशासन पूर्ण शासनाच्या ताब्यात असल्यासारखं काम करत आहे. प्रशासन आमदाराच्या दडपशाहीखाली काम करत आहे. म्हणून आम्ही या प्रशासनाचा विरोध करतो”, अशी भूमिका संतोष टारफे यांनी मांडली.