यंदा थंडीचा कडाका कमी असणार, हे आहे कारण
weather Update | राज्यात यंदा थंडी का जाणवत नाही आणि येत्या काही काळात थंडी पडणार का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. यंदा मॉन्सून प्रमाणे थंडीवर एल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे यंदा थंडी जाणवणार नाही.
जितेंद्र बैसाने , नंदुरबार, 17 डिसेंबर | यंदा पावसाळा जाणवला नाही. मॉन्सून बरसलाच नाही. अखेर सरासरी न गाठता निरोप घेतला. आता डिसेंबर महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागांत थंडी जाणवत नाही. पुणे, नाशिकसारख्या भागांत अजून थंडी जाणवत नाही. या शहरांचे तापमान १२ अंश सेल्सियसच्या वर आहे. राज्यातील अनेक शहरांची परिस्थिती यंदा अशीच आहे. राज्यात यंदा थंडी का जाणवत नाही आणि येत्या काही काळात थंडी पडणार का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. यंदा मॉन्सून प्रमाणे थंडीवर एल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे यंदा थंडी जाणवणार नाही.
थंडी कमी असणार, तापमाण जास्त
एल निनोचा प्रभाव यंदा अधिक आहे. एल निनोमुळे महाराष्ट्रात यावर्षी थंडी कमी असणार आहे. हिवाळ्यात दर वर्षापेक्षा कमी थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त केला आहे. यामुळे डिसेंबर महिना अर्धा झाला तरी थंडी जाणवत नाही. यंदा थंडी कमी असल्यामुळे उन्हाचा कडाका जास्त असणार आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी तापमान नाशिक आणि जळगावचे होते. जळगाव १२. ७ अंश तर नाशिकचे तापमान १२.३ अंश सेल्सियस होते.
कमी थंडीचा रब्बीवर परिणाम
गहू, हरबारा या पिकांना जास्त थंडीची गरज असते. परंतु यंदा कमी थंडी असल्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंड वातावरण पोषक असते, मात्र तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने रब्बी हंगामातील पिकांचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगोदरच शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामात उत्पन्न मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. आता शेतकऱ्यांची सर्व अशा रब्बी हंगामावर लागून होती. मात्र थंडीचे प्रमाण कमी होणार असल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरची संकटात वाढ होत असल्याची स्थिती आहे.