MLC election 2022:विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांची ‘दादा’गिरी, सर्वपक्षीय नेते, अपक्ष आमदार आवर्जून भेटीला, फडणवीसांना चितपट करणार?
बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सगळेच पक्ष देव पाण्यात घालून बसले होते, त्या हितेंद्र ठाकूर यांनीही मतदानानंतर अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवारांची दादागिरी पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे. ही निवडणूक अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण ठरणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
मुंबई – विधान परिषद निवडणुकीची (MLC election)चुरस शिगेला पोहचलेली, भाजपा आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या असलेल्या या निवडणुकीसाठी सकाळपासून विधान भवन परिसरात आमदारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत होती. यातही सर्व पक्षांचे आमदार जातीने मत देण्यासाठी विधानभवन परिसरात येत होते. त्यात कुणी आजारी होते, कुमी वृद्ध होते, ते आपआपल्या परीने येऊन मतदानाचा हक्क बजावत होते. प्रामुख्याने सर्वपक्षीय नेते आणि अपक्ष आमदार आल्यानंतर मतदान करत होते आणि एका नेत्याची भेट घेत होते. विधान भवन परिसरात होती ती या भेटीची.. ती भेट होती उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)यांची. भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंसह इतरही काही नेत्यांनी सकाळच्या वेळात अजित पावरांची आवर्जून भेट घेतली. तर बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सगळेच पक्ष देव पाण्यात घालून बसले होते, त्या हितेंद्र ठाकूर यांनीही मतदानानंतर अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवारांची ‘दादा’गिरी पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे. ही निवडणूक अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis)अशी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्राचा राजकीय चाणक्य कोण ठरणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
फडणवीसांना चितपट करणार का?
राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मुत्सद्देगिरी दाखवून दिली होती. आमदारांची संख्या नसतानाही त्यांनी भाजपाच्या तिसऱ्या उमेवाराला निवडून आणले होते. त्यासाठईचे डावपेच रचले होते, त्यानंतर त्यांचे राजकीय महत्त्वही वाढले होते. शिवसेनेला चितपट केल्यानंतर, आता विधान परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी फडणवीस आणि भाजपाचा थेट मुकाबला आहे. त्यातही अजित पवारांनी फडणवीसांचे हे आव्हान स्वीकारत, ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. आता अजित पवार यांचा संपर्कही राजकीयदृष्ट्या काही कमी म्हणता येणार नाही. त्यामुळे आता या निवडणुकीत छोटे पक्ष, अपक्षांची मते घेून अजित पवार फडणवीसांना मात देतात का, हा प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आहे. हितेंद्र ठाकूरांचे मतदान राष्ट्रवादीलाच झाल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर चंद्रकांत हंडोरेंना २९ मते पडली असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दोन मतांवर आक्षेप, मतमोजणीला विलंब होणार?
दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही काँग्रेसकडून भाजपाच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. गुप्त मतदान पद्धत असतानाही, त्यांनी त्यांचे मत टाकण्यासाठी दुसऱ्याला दिले म्हणून त्यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. आता ही मते बाद ठरतात की आक्षेप रद्द होणार, हे काही काळातच स्पष्ट होईल. दरम्यान या दोघांच्या मतदानावर घेतलेला आक्षेप हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.