जळगाव हादरलं, दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला गेलं, पण मन हेलावणारी घटना
जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या अमळनेर येथील दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. मोठ्या उत्साहात हे दोन्ही कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. पण या कुटुंबासोबत अतिशय दु:खद घटना घडलीय. या दोन्ही कुटुंबियांच्या कारला एक कंटेनरने धडक दिली. या धडकमध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय.
जळगाव | 11 नोव्हेंबर 2023 : दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. पण या दोन्ही कुटुंबांची ही ट्रीप शेवटची ठरली आहे. कारण या दोन्ही कुटुंबियांच्या कारला कंटेनरची जोराची धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा तर चेंदामेंदा झालाय. तर कारमधील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगावातील अमळनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचे कुटुंब दिवाळी निमित्त राजस्थानमध्ये फिरायला गेलं होतं. या दरम्यान राजस्थानमधील बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ कंटेनरने शिक्षकांच्या कारला जोराची धडक दिली. त्यामुळे मोठी अपघाताची घटना घडली. या अपघातात एका शिक्षकासह त्याचं पूर्ण कुटुंब ठार झालंय. तर दुसऱ्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून फक्त शिक्षकच बचावला आहे.
जळगाव जिल्हा हादरला
संबंधित घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अमळनेरचे रहिवासी असलेलेल राज्याचे मदत-पुनर्वसन मंत्री आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी राजस्थानमधील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला.