Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला शेवटचे 4 दिवस, शिष्टमंडळाला स्पष्ट सांगितलं
राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटी गावात गेलं. त्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.
जालना | 5 सप्टेंबर 2023 : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात जावून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. गिरीश महाजन यांनी एक महिन्यांचा वेळ मागितला. पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम राहिले. याउलट मनोज जरांगे यांनी सरकारला आणखी चार दिवसांचा वेळ दिला.
गिरीश महाजन आणि इतर नेत्यांनी मिळून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रचंड प्रयत्न केले. यावेळी मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांचे कौतुकही केले. गिरीश महाजन हे खरंच संकटमोचक आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. जवळपास अर्धा तास पेक्षा जास्त वेळ सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं नाही. शिष्टमंडळाशी सर्व चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. तसेच गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली.
‘आंदोलन मागे घेत नाही’
“आपण आंदोलन मागे घेत नाहीयत. आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने आलेल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना आणखी चार दिवसांचा वेळ दिला आहे. चार दिवसात ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करुन वाटलावावं. कारण आपल्याला हे आरक्षण कायमस्वरुपाचं हवं आहे. आणखी चार दिवसांचा वेळ देऊ. आपण सगळ्यांनी चार दिवस वाट पाहा. चार दिवस सर्व इथे येऊ”, असं मनोज जरांगे म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले?
यावेळी गिरीश महाजन यांनी भूमिका मांडली. “मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झालीय. या बैठकीला महत्त्वाचे मंत्री आणि मोठे अधिकारी होते. या बैठकीत एका दिवसात मार्ग निघणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तीन महिन्याची वेळ होती. पण मधल्या काळात अनेक घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन इथे आलो आहोत”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“आपल्याला कायमस्वरुपी आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी सरकार सकारात्मक आहे. शंभर टक्के आरक्षण मिळेल. फक्त थोडा वेळ लागेल. सकारात्मक चर्चा झाली आहे, सर्व सकारात्मक आहेत. तांत्रिकदृष्ट्या काम करायचं आहे. आता आम्ही शब्द दिलेला आहे. पाच दिवसांत बैठक होईल. यापेक्षा जास्त दिवस लागणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
कार्यकर्त्यांचा गोंधळ, जरांगे संतापले
यावेळी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावर जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संतापले. “मी तुमच्यासाठी जीव देतोय. तुम्हाला आरक्षण देतो. तुमच्या पाया पडतो. तुम्ही गप्प बसा”, असं मनोज जरांगे म्हणाले. त्यांनंतर गिरीश महाजन पुन्हा बोलू लागले. “माझी विनंती आहे. प्रकृतीची काळजी घ्या. आपण उपोषण सोडलं तर चांगलं होईल. जीव धोक्यात टाकू नका. चर्चेतू मार्ग निघेल”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“गिरीश भाऊंनी स्पष्ट सांगितलं आहे. चार दिवसांचा वेळ तुम्हाला दिलाय. तुम्ही स्पष्ट सांगितलं म्हणून चार दिवसांचा वेळ देतो”, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. “त्यांनी आपल्याकडे 1 महिन्यांचा वेळ मागितला. आपण त्यांना एक महिन्याचा वेळ देऊ शकत नाही. गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं की 4 दिवस थोडे लवकर होतंय. मी स्पष्टच सांगितलं की, चार दिवसच वेळ”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.