मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सुरु असताना त्यांनी वैद्यकीय उपचार करुन घेण्यास नकार दिला होता. उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या किडनी अन् लिव्हरवर सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर | 3 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २४ ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले द्या, ही त्यांची प्रमुख मागणी होती. गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात जाऊन त्यांच्या चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांचा समावेश होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. आरक्षणाचा प्रश्न एक-दोन दिवसात सुटण्यासारखा नाही. न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी थोडा वेळ लागेल. घाईघाईने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे शिष्टमंडळाने त्यांना सांगितले. त्यानंतर नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या उपोषण दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले नाही. गुरुवारी त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज असल्याची माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली.
उपोषणा दरम्यान खालवली होती प्रकृती
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणा दरम्यान खालवली होती. ते पाणी घेत नव्हते. पोटात काहीच नसल्यामुळे त्यांना त्रास होत होता. शरीरात ताकत राहिली नव्हती. स्पष्टपणे बोलता येत नव्हते. त्यानंतर ग्रामस्थांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी पाणी घेतले होते. त्यामुळे थोडे बरे वाटत होते. परंतु या संपूर्ण उपोषण दरम्यान त्यांनी कोणतेही वैद्यकीय उपचार घेतले नव्हते. त्यामुळे गेल्या नऊ दिवसांत त्यांच्या प्रकृतीची तपासणी झाली नव्हती. अखेर गुरुवारी तपासणी केल्यानंतर शुक्रवारी त्याचा अहवाल आला आहे. त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. उपचारानंतर ते पूर्ण बरे होतील, असे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले.
२४ डिसेंबर ही तारीख ठरली
निवृत्त न्यायमूर्ती आणि शिष्टमंडळासमोर २४ डिसेंबर ही तारीख ठरली आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. वकील आणि शिष्टमंडळासमोर २४ डिसेंबर ही तारीख ठरली आहे. ती लिहून घेतली आहे. २ जानेवारी ही तारीख ठरली नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.