CM Thackarey | हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ऑपरेशनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विधानभनवाला भेट
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात चालत जाऊन पाहणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत होती
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशननंतर पहिल्यांदाच विधानभवला भेट दिली. यावेळी त्यांनी विधानभवनाच्या दारापासून विधानसभेच्या सभागृहापर्यंत चालत गेले असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात चालत जाऊन पाहणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र उद्धव ठाकरेंनी आज चालत विधानभवनाच्या सभागृहात पाहणी केली.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी फिट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा यानिमित्तानं सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांना मणका-मानदुखीचा त्रास
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या दरम्यानच्या काळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला होता. दरम्यान, आता त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर ते पहिल्यांदा विधानभवनाला भेट देण्यासाठी गेले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं यातून अधोरेखित होतंय. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आपल्याला सभागृहात दिसतील, अशी शक्यता बळावली. गेल्या अधिवशेनासारखेच हे अधिवेशनही विविध मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता आहे.