नगराध्यक्ष निवडणुकीत लातुरात भाजपाची विजयी सलामी, बहुमत नसताना कसं गणित जुळवलं?
भारतीय जनता पार्टीच्या (Bjp) कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच नरपंचायती (Nagarpanchayat) आणि नगरपरिषदांच्या नवडणुका (Nagarparishaed Elections) पार पडल्या आहेत. त्यामुळे गावगाड्याचं आणि तालुक्याच राजकारण अजूनही धगधगत आहे. भारतीय जनता पार्टीच्या (Bjp) कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांना मिळून आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाला तीन जागा मिळाल्या आहेत. तथापि, भाजपाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले.
चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा
नगरपंचायतीत बुधवारी नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने निवडून आले तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपाला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले. लातूर जिल्ह्यातच शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपाने 9 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तेथे मंगळवारी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका मायाताई धुमाळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी भाजपाच्याच नगरसेविका सुषमा मठपती यांची निवड झाली. स्थानिक पातळीवर या निवडणुकांना अत्यंत महत्व असतं. या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात. ज्याचा पंचायतींच्या निवडणुकीत दबदबा त्याचाच आमदार असेच एकंदरीत समीकरण असते.
भाजप नंबर वन पक्ष-चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चाकूर व शिरूर अनंतपाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे तसेच या यशाबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सर्व नेते कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे तसेच स्पष्ट बहुमत मिळालेल्या नगरपंचायतींच्या बाबतीतही भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. असा दावाही चंद्रकांत पाटलांकडून करम्यात आला आहे.