‘कॉंग्रेस गद्दार आणि भाजप महागद्दार’, महादेव जानकर यांचा घणाघात
"महादेव जानकर जर तुम्हाला चालत नसेल तर बच्चू भाऊंच्या पाठीशी मागे राहा. आम्ही स्वतंत्र लढलो. आम्हाला लोकांनी निवडणुकीमध्ये पाडलं. मोठ्या पक्षाला मतदान करू नका. कॉंग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे", असा घणाघात महादेव जानकर यांनी केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आज शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील सहभागी झाले. यावेळी महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर चांगलाच निशाणा साधला. “बच्चू कडू यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मी दिल्लीवरून आलो आहे. मी कॅबिनेट मंत्री असताना अनेक योजना आणल्या. मी जी योजना आणली त्याला अजित दादा यांनी निधी दिला नाही. महादेव जानकर जर तुम्हाला चालत नसेल तर बच्चू भाऊंच्या पाठीशी मागे राहा. आम्ही स्वतंत्र लढलो. आम्हाला लोकांनी निवडणुकीमध्ये पाडलं. मोठ्या पक्षाला मतदान करू नका. कॉंग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे”, असा घणाघात महादेव जानकर यांनी केला. “यापुढे आम्ही पुणे, संभाजीनगरमध्ये मोर्चा काढू. मी मंत्री असताना धनगर मुलांसाठी होस्टेल काढले. मतदान करताना विचार करून करा. ही तर सुरुवात आहे. हे मी सरकारला सांगतो. आम्ही दोघेही फकीर आहोत”, असंही महादेव जानकर म्हणाले.
‘अजित दादा आता कहा गया आपका वादा?’
यावेळी आमदार बच्चू कडू यांनीदेखील भूमिका मांडली. “मते मिळावी म्हणून मेहनत न करता पैसे मिळणारी योजना सुरू केल्या. अजित पवार म्हणायचे 5 तारखेपर्यंत जर दिव्यांग बांधवाला मानधन मिळालं नाही तर सचिवांचा पगार होणार नाही. दादा आता कहा गया आपका वादा?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. “वनविभाग मस्ती करत असेल तर आज तुम्हाला सांगायला आलो हा लट आम्ही चालवणार. हा जाती-धर्माचा मोर्चा नाही. पण तरी मी वारंवार हिंदू हा उल्लेख का करतो? कारण काही लोक धर्माच्या नावाखाली वाटून हक्काची लढाई मागे पाडत आहेत. आज लट आणला उद्या आणखी काही आणू”, असं बच्चू कडू म्हणाले.
“आम्हाला मेंढरं, म्हशी घ्यायला लावता, कोंबड्या घ्यायला लावता. कधी दोन-तीन मेंढरं कलेक्टरला द्या. वनविभागवाले त्रास देतात. खोटे गुन्हे दाखल केले जातात. बटेंगे तो हिंदू मेंढपाळ कंटेंगे. जातीपातीचं राजकारण केलं गेलं”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि गायब झाले. आता त्यावर बोलायला तयार नाहीत. कृषीमंत्री म्हणाले चार-पाच महिने कर्जमाफी होणार नाही. मग बोलले कशाला? तुरीचे भाव कमी झाले. सोयाबीनला भाव नाही. मेंढरं चारायला जागा नाही. शेतमालाला भाव नाही. आम्ही थांबणारे नाही. गिरता वहीं है जो रुकते है. लेकीन हम रुकनेवाले नहीं. ये तो ट्रेलर हैं. पिक्चर अभी बाकी है”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.