राज्यातील विधानसभेत आतापर्यंत 245 अपक्ष आमदारांची एन्ट्री, 13 निवडणुकांमध्ये सर्वाधिक अपक्ष आमदार या वर्षी, ठरले किंगमेकर
Maharashtra Assembly Election News: राज्यातील विधानसभेत सर्वात कमी अपक्ष आमदार 2014 मध्ये निवडून आले. त्यावेळी केवळ 7 अपक्ष उमेदवार आमदार होऊ शकले. त्यावर्षी जवळपास 1700 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले अपक्ष आमदार चंद्रपूरमधील आहे.
Maharashtra Assembly Election News: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी अपक्ष आमदार म्हणून अर्ज भरला आहे. राज्यातील निवडणुकीत अपक्षांची चांगलीच भाऊगर्दी असते. यंदाही अपक्ष उमेदावारांची संख्या मोठी असणार आहे. परंतु त्यातून किती जाणांना आमदार होण्याची संधी मिळते? हे 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे. राज्यात आतापर्यंत 1962 पासून 13 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात 245 अपक्ष आमदार निवडून आले आहेत. सर्वाधिक अपक्ष आमदार 1995 मध्ये निवडून आले. ती संख्या 45 होती. त्यावेळी युतीच्या सत्ता स्थापनेत या आमदारांची भूमिका महत्वाची ठरली. तेव्हा अपक्ष आमदारांचे नेते हर्षवर्धन पाटील होते.
अनेक अपक्ष आमदार राजकीय पक्षांमध्ये दाखल
राज्यात मागील पंचवर्षिकमध्ये म्हणजे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 1400 आमदार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील केवळ 13 जणांना विजय मिळवता आला. राज्यातील अपक्ष आमदारांची राजकीय ताकद ओळखून इतर पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात संधी दिली आहे. 1995 मध्ये अपक्ष आमदारांचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील कधीकाळी भाजपमध्ये होते. परंतु यंदा ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकार स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष आमदार एकत्र आले होते. त्यातील काही जणांना मंत्रिपदही मिळाले होते.
अपक्ष उमेदवारांची कामगिरी अशी
राज्यातील विधानसभेत सर्वात कमी अपक्ष आमदार 2014 मध्ये निवडून आले. त्यावेळी केवळ 7 अपक्ष उमेदवार आमदार होऊ शकले. त्यावर्षी जवळपास 1700 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले अपक्ष आमदार चंद्रपूरमधील आहे. किशोर जोरगेवार हे 2019 मध्ये 72 हजार 611 मतांनी निवडून आले होते. तसेच सर्वात कमी मतांनी निवडून आलेले आमदार दिग्रसचे संजय देशमुख आहे. ते केवळ 126 मतांनी 1999 मध्ये निवडून आले होते.
कधी किती अपक्ष जिंकले
|
|
वर्ष | आमदारांची संख्या |
1962 | 15 |
1967 | 16 |
1972 | 23 |
1978 | 28 |
1980 | 10 |
1985 | 20 |
1990 | 13 |
1995 | 45 |
1999 | 12 |
2004 | 19 |
2009 | 24 |
2014 | 7 |
2019 | 13 |