LIVE | अमरावतीत एसटीची ट्रॅक्टरला धडक, बस पुलाखाली कोसळली, 20 जण जखमी

| Updated on: Jan 17, 2021 | 11:05 PM

येथे तुम्हाला महाराष्ट्र तसेच देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व लाईव्ह अपडेट्स मिळतील.

LIVE | अमरावतीत एसटीची ट्रॅक्टरला धडक, बस पुलाखाली कोसळली, 20 जण जखमी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE अपडेट.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jan 2021 09:40 PM (IST)

    अमरावतीत एसटीची ट्रॅक्टरला धडक, बस पुलाखाली कोसळली, 20 जण जखमी

    अमरावती : एसटीची ट्रॅक्टरला धडक लागून बस पुलाखाली कोसळल्याची घटना नागपूर-वरूड मार्गावरील ढगा येथे घडली आहे .अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांची संख्खा अंदाजे 20 च्या जवळपास असल्याची प्राथमिक महिती आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना दवाखान्यात हलविण्यात आले आहे

  • 17 Jan 2021 09:37 PM (IST)

    शहापूर तालुक्यात 10 ते 12 कबुतरे दगावले

    शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील खातिवली गावातील शुभ वास्तू या शेकडो लोकवस्तीच्या सेक्टर 2 आणि 3 मध्ये 10 ते 12 कबुतरे तडफडत मरण पावली. मुंबई – नाशिक महामार्गाच्या बाजुला वशिंद जवळ असलेल्या इमारतीच्या आजूबाजूला, टेरेसवर, पार्कींगवर कबुतरे मृतावस्थेत आढळली.

  • 17 Jan 2021 08:28 PM (IST)

    ‘काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे’, हंसराज अहिर यांचा घणाघात

    चंद्रपूर : “गेल्या दोन टर्मपासून काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेता बनवू शकलेले नाही. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची असताना खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे आहेत”, असा घणाघात माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी केली. “बाळू धानोरकर यांचा हा विजयाचा उन्माद दिसून आलाय. देशाच्या पंतप्रधानाला आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही, त्यांनी पहिले आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहून घ्यावी. विरोधी पक्षाचा नेता बनवायची यांची ताकत नाही, मोदींविरोधात कोणीही लढू शकतं पण त्यांची भाषा कोणाला पटणार नाही”, असं अहिर म्हणाले.

  • 17 Jan 2021 08:23 PM (IST)

    ‘फडणवीस सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा’, प्रकाश शेंडगे यांचं मोठ्ठं वक्तव्य

    प्रकाश शेंडगे यांचं मोठ्ठं वक्तव्य, मागील सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा. अडीच हजार शिक्षकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम मागील सरकारने केलंय.  12 फेब्रुवारी 2019 रोजी 10,361 पदांची शिक्षक भरती निघाली. मराठा संघटनांनी यास विरोध दर्शवल्याने शिक्षण उपसमितीच्या चारुशिला चौधरी यांनी 22 फेब्रुवारीला 50 टक्के जागाच भरण्याचा आध्यादेश काढला, जवळपास 5 हजार मागासवर्गियांची भरती रखडली. धनगर समाजातील राहूल खरात आणि वंजारी समाजातील दत्ता नागरे या दोन शिक्षकांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका नं. 670/2019, 3 एप्रिल 2019 ला दाखल केली.  त्याची सुनावणी मागच्या आठवड्यात झाली.  त्यावेळीही शालेय शिक्षण विभागाने गंभीर चूक केल्याचं उघड झालं. शिक्षकांची केवळ 2,431 पदं शिल्लक असल्याचं निष्पन्न झालं. अडीच हजार पदांचं काय झालं? त्याचा खुलासा करण्याची प्रकाश शेंडगेंची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, कारवाई करा, रखडलेली भरती करा, अशी राज्य सरकारकडे मागणी, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

  • 17 Jan 2021 08:17 PM (IST)

    वसईच्या सनसिटी रोडवर 4 मोटरसायकलचा भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी

    वसईच्या सनसिटी रोडवर 4 मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत तर 1 महिला किरकोळ जखमी झाली आहे.  रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

    केटीएम आणि सुझुकी मोटारसायकलची प्रथम सामोरासमोर जोरदार टक्कर झाली. त्याचदरम्यान भरधाव वेगात त्यांच्या मागून येणाऱ्या आणखीन दोन गाड्या देखील एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोन्ही बाईक चालक गंभीर जखमी झाले असून जखमींना वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आज रविवार असल्याने सनसिटी रोडवर नागरिकांसह मोटारसायकल धारकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती.

  • 17 Jan 2021 08:13 PM (IST)

    वसई-विरार महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपचा 115 जागा जिंकणार असल्याचा दावा

    वसई विरार (पालघर) : महापालिकेच्या निवडणुका घोषित होण्याअगोदरच पालिकेच्या 115 जागा जिंकण्याचा भाजपने निर्धार केला आहे.  भाजपची वसई विरार शहरामध्ये जिल्हा कार्यकारणी बैठक आज पार पडली. वसई विरार शहर जिल्हा प्रभारी तथा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

    जनहितार्थ लढणारच, परिवर्तन होणारच असा ध्यास घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार आणि त्या जिकणार असल्याचा इशारा प्रसाद लाढ यांनी दिला आहे. रस्ते, परिवहन सेवा, डंपिंग ग्राउंड, महापालिकेतून 29 गावे वगळण्याचा मुद्दा, महापालिकेत वाढणारे अनाधिकृत बांधकामे, शहरातील मूलभूत समस्यांचा बोजवारा असे एक ना अनेक प्रश्न घेऊन लोकांच्या हितासाठी भाजप ही निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोपही भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला. वसई-विरार महापालिकाचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी हे शिवसेनेचे शाखा प्रमुख असल्या सारखे काम करत आहेत, अशी टीकाही यावेळी भाजपने केली.

  • 17 Jan 2021 08:08 PM (IST)

    बाईकवर स्टंट करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई

    मुंबई : बाईकवर स्टंट करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बाईकस्वारांचा सुरू होता स्टंट. अंधेरी ते माहीम दरम्यानचे 27 ठिकाणचे सीसीटीव्ही केले चेक, स्टंटबाजी करणाऱ्या दोन आरोपींना मोटरसायकलसह केली अटक, चालक कुणाल सिंग आणि त्याचा साथीदार रिषभ सिंग अटकेत, 14 जानेवरी 2021 च्या रात्रीचा स्टंट करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता

  • 17 Jan 2021 08:01 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजनीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जमाव बंदी

    नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजनीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मतमोजणीनंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांवर ही बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांच उल्लंघन झाल्यास होणार कारवाई होईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून मतमोजनीची तयारी पूर्ण झाली आहे.  संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे.

  • 17 Jan 2021 02:49 PM (IST)

    वेब सिरीजबाबत कायदे व्हावे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणार : राम कदम

    बहुचर्चित तांडव वेबसिरीजला भाजपनं विरोध दर्शवला आहे.या संदर्भात भाजपचे आमदार राम कदम हे चिराग नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनपासून हटणार नाही ही अशी भूमिका त्यांनी मांडली होती. दरम्यान, पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर राम कदम म्हणाले की, “पोलिसांनी तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांना समन्स पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे”. दरम्यान, राम कदम यांनी सांगितले की, “केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेब सिरीजबद्दल कायदा करण्याची मागणी करणार आहोत.”

  • 17 Jan 2021 02:09 PM (IST)

    कात्रजजवळ फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

    पुण्यात कात्रजजवळील गुजरवाडीत फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

  • 17 Jan 2021 01:59 PM (IST)

    कोव्हिन अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी, कोरोनावरील लसीकरण स्थगित : महापौर

    कोव्हिन अ‍ॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या सुधारण्यासाठी 17 आणि 18 जानेवारीला लसीकरण स्थगित करण्यात आलं आहे. कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करू नये, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं आहे. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत की, लसीकरणाची ऑफलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यामुळे अ‍ॅपच्या तांत्रिक अडचणी दूर करुन लसीकरण सुरू होईल.

  • 17 Jan 2021 01:34 PM (IST)

    शिर्डीत साईदर्शनासाठी अलोट गर्दी, 2 किमींपर्यंत रांगा

    अहमदनगर : रविवार असल्याने आज शिर्डीत साईदर्शनासाठी अलोट गर्दी ‌झाली आहे. दर्शनासाठी येथे 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने दर्शनासाठी ऑफलाईन पासची व्यवस्था केली आहे. येथे ऑफलाईन दर्शन पास आणि ऑनलाइन पास धारकांची रांगही एक किलोमीटरपर्यंत दिसून येत आहे. तर ऑनलाईन पास घेऊन न आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय ‌होत असल्याने भाविक संताप व्यक्त केला जात आहे.

  • 17 Jan 2021 01:14 PM (IST)

    चंद्रपुरात कोळसा खानीत मृतदेह आढळल्याने खळबळ, हिंस्र पशुंच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता

    चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापुर कोळसा खदान परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हिंस्र पशुंच्या हल्ल्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 35 वर्षे असून त्याची ओखळ पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा तपास वनविभाग आणि दुर्गापुर पोलीस करत आहेत.

  • 17 Jan 2021 12:58 PM (IST)

    तांडव वेब सिरीजविरोधात भाजप आक्रमक, निर्मात्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी

    तांडव या वेब सिरीजला भाजपने विरोध केला आहे. ये वेबसिरीजमध्ये हिंदूंवर टीका केलेली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम चिराग नगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत ते तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. जो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

  • 17 Jan 2021 12:24 PM (IST)

    त्यांना लिहिण्याचा अधिकार, सामनातील भूमिकेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मत

    सामनामधील अग्रलेखाबाबत राजेश टोपे म्हणाले की, वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांना लिहिण्याचा अधिकार असतो. त्यांना लिहू द्या, आम्हाला काहिही अडचण नाही.

  • 17 Jan 2021 12:14 PM (IST)

    नामांतरापेक्षा विकासावर चर्चा व्हावी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा टोला

    औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून मांडलेल्या भूमिकेला उत्त देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाविकास आघाडीती तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमाच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांच्या कोअर कमिटीने निर्णय घेतल्यास कोणालाही काही अडचण नाही, नामांतर वेळी जनतेच्या अपेक्षा इच्छाही समजावून घेतल्या पाहिजेत, वेळ देऊन चर्चेतुन सोडवता येतात. नामकरणपेक्षा त्या शहरांचा विकास होणे गरजेचे आहे. उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा. उस्मानाबाद येथील मेडिकल कॉलेजसाठी आरोग्य विभागाची जमीन व 400 कोटींची मालमत्ता वर्ग केली त्यामुळे सामान्य गोरगरिबांची मुले शिकतील. नामांतरवर चर्चा नको विकास हवा.

  • 17 Jan 2021 12:01 PM (IST)

    शिकारी शिकार करण्यापूर्वी ढोल वाजवतात तसाच प्रकार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सुरु केलाय : प्रकाश आंबेडकर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरील लसीचा शुभारंभ केल्याचा उदोउदो केला जातोय.पूर्वीच्या काळी शिकारी लोक शिकार करण्यासाठी जसे ढोल वाजवीत सर्व जंगलभर फिरत असतात तसाच प्रकार सध्या सुरु आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

  • 17 Jan 2021 11:17 AM (IST)

    आईच्या मृत्यूनंतर बापाकडून छळ, पोलिसांत गुन्हा दाखल

    आईच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या मुलांचा पित्याकडून छळ होत असल्याचा घटना समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरी येथे जन्मदाता पित्याने आपल्या मुलांना अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणी नाशिकच्या इगतपुरी पोलिसांत पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना मारहाण करणाऱ्या पित्याचं नाव राहुल मोरे असून तो रेल्वे विभागात नोकरीला आहे.

  • 17 Jan 2021 11:05 AM (IST)

    हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात जाणार, प्रवेशाच्या परवानगीबद्दल साशंकता

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावला जाणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाहा हेसुद्धा विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बेळगावात जाणार आहेत. त्यामुळे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगावात प्रवेश दिला जाणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

  • 17 Jan 2021 10:50 AM (IST)

    नालासोपारा येथे तलावात बुडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

    पालघर : नालासोपारा येथे 17 वर्षीय मुलाचा पूर्व नागले तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह 12 तासानंतर बाहेर काढण्यात आला. त्यासाठी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रवींद्र मेडी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • 17 Jan 2021 10:46 AM (IST)

    धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक, सोमवारी आंदोलन करणार

    मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे. या संदर्भात महिला मोर्चाची भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयांवर निदर्शनं केली जाणार आहेत. या वेळी महिला मोर्चाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे अजूनही वेळ आहे. त्यांना स्व:तहून राजीनामा द्यावा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाने दिला आहे.

  • 17 Jan 2021 10:20 AM (IST)

    औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय : संजय राऊत

    मुंबई : औरंगजेब क्रुर शासक होता. त्याला परधर्माविषयी प्रेम नव्हंत. तो धर्मांध होता. अशा राजाच्या नावाविषयी कुणीही आग्रही राहू नये अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले. “ज्यांना औरंगजेब आणि संभाजीराजे काय आहे हे माहीत करुन घ्यायचे असेल तर आधी औरंगजेब समजून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही सांगितले आहे, की औरंगाबाद शहर आमच्यासाठी संभाजीनगर आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

  • 17 Jan 2021 10:11 AM (IST)

    मनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन, दिली मोठी जबाबदारी

    ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी संजय पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. यावेळी मनसेतून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवक संजय भालेराव यांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. भालेराव यांची घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. संजय भालेराव यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका संजना भालेराव यांनी 2017 मध्ये मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • 17 Jan 2021 10:03 AM (IST)

    एनसीबीचा खारघरमध्ये 2 ठिकाणी छापा, 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

    नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने शनिवारी खारघरमध्ये 2 ठिकाणी छापा टाकला. यावेळी एनसीबीने एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. यावेळी या नागरिकाकडून 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव पॉल असे आहे.

  • 17 Jan 2021 09:16 AM (IST)

    विदर्भात तापमानाची घसरण , गोंदियाचा पारा 8.6 अंशावर

    मागील काही दिवसांपासून राज्यात थंडी गायब झालेली असताना आता पुन्हा वातावरणात गारवा जाणवत आहे. विदर्भात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी वाढली आहे. मध्यंतरी झालेले ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे थंडी कमी झाली होती. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात राज्यातील निच्चांकी तापमान नोंदवले गेले असून पारा 8.6 अशांवर पोहोचला आहे.

  • 17 Jan 2021 09:10 AM (IST)

    तांडव वेब सिरीजला भाजपचा विरोध, हिंदूविरोधी कंटेंट असल्याचा आरोप

    तांडव या वेब सिरीजवर भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी घेतला आक्षेप घेतला आहे. या वेब सिरीजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या वेब सिरीजमध्ये देवांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली असून माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांना त्यांनी पत्रही लिहीलं आहे.

  • 17 Jan 2021 08:25 AM (IST)

    पुण्यात कोरोना लसीकरणाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची पाठ; 330 कर्मचाऱ्यांची दांडी, 32 जणांचा नकार

    पुणे : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. मात्र पुण्यात शनिवारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 45 टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणास दांडी मारल्याचे समोर आले आहे. येथे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 800 आरोग्य सेवकांची निवड करण्यात आली होती. यावेळी प्रत्यक्षात मात्र फक्त 438 जणांनी लस टोचून घेतली. विशेष म्हणजे यातील 32 आरोग्य सेवकांनी रुग्णालयात आल्यावर लस टोचून घेण्यास नकार दिला दिला आहे. तर बाकीच्या 330 आरोग्य सेवकांनी वेगवेगळ्या कारणांनी लसीकरणाला दांडी मारली आहे.

  • 17 Jan 2021 08:10 AM (IST)

    मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर ट्रेलरला आग, जीवितहानी नाही

    रायगड : मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला लागली आग लागली आहे. पुणे आज पहाटे ही घटना घडली आहे. ही घटना घडताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून येथील वाहतूक पुन्हा सुऱळीत झाली आहे.

  • 17 Jan 2021 08:03 AM (IST)

    कळमेश्वर तालुक्यातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही, रिपोर्ट निगेटिव्ह

    नागपूर : राज्यात बर्डफ्लूमुळे अनेक पक्षी मरण पावलेले असताना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कळमेश्वर तालुक्यातील 2 पोल्ट्री फार्म तसेच मौदा तालुक्यतील एका शेतातील काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील परिसरता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर मरण पावलेल्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 17 Jan 2021 06:28 AM (IST)

    नालासोपारा ते वसई फाटा वाहतूक खोळंबली, वाहनांच्या 2 किमीपर्यंत रांगा

    वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नालासोपारा ते वसई फाटा येथे वाहतूक खोळंबळी आहे. येथे वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. वसई सातीवली फाटा परिसरात रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे. चिंचोटीपासून पुढे वाहतूक सुरळीत चालू असून, वर्षोवा ब्रिजवर सुद्धा काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Published On - Jan 17,2021 9:40 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.